अकोला : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये लोकशाही पंधरवडा साजरा केला जाणार आहे. विशेष म्हणजे, त्या दिवशीच्या ग्रामसभेत प्रामुख्याने फॉगिंग मशिन, घंटागाड्या खरेदी करण्यासाठी खर्चाच्या तरतुदीला मंजुरी घेण्याचेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेचे नियोजन त्या पत्रात देण्यात आले आहे.ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार ही ग्रामसभा घेतली जाते. या ग्रामसभेचे यू-ट्युबवर प्रक्षेपण करण्याचेही सांगण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेपूर्वी प्रभाग सभा, महिला सभाही घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर होणाºया ग्रामसभेतील विषयांचे नियोजन देण्यात आले. त्यामध्ये २६ जानेवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान लोकशाही पंधरवडा साजरा करून त्याबाबत सविस्तर माहिती गावात दिली जाईल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सामाजिक अंकेक्षण ग्रामस्थांसमोर होणार आहे. १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, अंगणवाडीसाठी आवश्यक साहित्य, दुरुस्ती करणे, ग्रामपंचायतींमध्ये फॉगिंग मशीन, घंटागाड्या खरेदी करण्यासाठी निधी खर्चाला मंजुरी तसेच तरतुदीला मंजुरी घेणे, १४ वित्त आयोगाच्या खर्चाचेही सामाजिक अंकेक्षण करणे, २०१९-२० या कालावधीत केंद्र, राज्य, जिल्हा परिषदेकडून राबवल्या जाणाºया विविध योजनांची माहिती देणे, वैयक्तिक लाभार्थींची निवड करणे, जलजीवन मिशन अंतर्गत गाव कृती आराखडा गावनिहाय, नळ योजना, नळजोडणीसाठी तयार करणे, स्थानिक परिस्थितीवर विचार करून वेळेवर येणारे विषय सभेत घ्यावे, असेही निर्देश देण्यात आले. या ग्रामसभेत प्रामुख्याने शिक्षक, तलाठी, कृषी सहायक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी, तसेच इतर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थित ठेवावे, तसेच ग्रामस्थांचीही उपस्थिती वाढवावी, या सर्व बाबत कार्यवाहीचा अहवाल गटविकास अधिकाºयांमार्फत सादर करावा, असेही पत्रात मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी म्हटले आहे.