अकोला : आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर प्रयत्न होत असले, तरी शहरासह जिल्ह्यात कीटकजन्य आजारांनी पछाडलेल्या रुग्णांची संख्या मात्र वाढतच आहे. डेंग्यू या कीटकजन्य आजाराचा प्रादूर्भाव कमी होण्याची चिन्हे नसून, गत काही दिवसांत ८ ‘कन्फर्म’ रुग्ण आढळल्याने ‘डेंग्यू पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या २१ वर पोहोचली आहे. याच काळात डेंग्यू संशयीत रुग्णांमध्ये ७१ ची भर पडून ही संख्या १२३ वर पोहोचली आहे.एडीस इजिप्टाय या डासापासून डेंग्यू हा आजार होतो. परिसर आणि घराघरांमध्ये स्वच्छ पाण्यात या डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्याने डेंग्यूच्या रुग्णांची संख्याही वाढतच आहे. तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, सांधे दुखी, अंग दुखणे, रक्तातील प्लेटलेटची संख्या कमी होणे आदी लक्षणे असलेले रुग्ण शहर व जिल्ह्यात आढळून येत आहेत. सर्वोपचार रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये उपरोक्त लक्षणे असलेले रुग्ण दाखल होत आहेत. डेंग्यूचा वाढत्या प्रादूर्भावास अटकाव घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा जंगजंग पछाडत असली, तरी रुग्णांची संख्या मात्र वाढतच असल्याचे वास्तव आहे.शहरात जास्त प्रादूर्भाव१ जानेवारी ते १० सप्टेंबर या कालावधीत शहर व जिल्ह्यात डेंग्यूची लागण झालेले २१ रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये शहरी भागातील १४, तर ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे. संशयीत १२३ रुग्णांमध्ये अकोला शहरातील ८४, तर उर्वरित जिल्ह्यातील ३९ रुग्णांचा समावेश आहे.८० टक्के घरांमध्ये आढळल्या एडिस डासाच्या अळ्या!महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून जून ते आॅगस्ट या तीन महिन्यांच्या कालावधीत शहरातील ३७२७ घरांमध्ये कंटेनर सर्व्हे करण्यात आला. यामध्ये ८० टक्के घरांमध्ये एडिस एजिप्टाय या डासांच्या अळ्या आढळून आल्याचे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांनी सांगितले.या भागांमध्ये आढळले रुग्णन्यू तापडिया नगर, अशोक नगर, मलकापूर, डाबकी रोड, खंगरपुरा यांसह शहरातील बाह््यभागातील वस्त्यांमध्ये डेंग्यूचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद आहे.हिवताप विभागाकडून उपाययोजनाडेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर हिवताप विभाग व इतर आरोग्य यंत्रणांकडून सर्वेक्षण करण्यात येत असून, विविध भागात धुरळणी, फवारणी करण्यात येत आहे. एवढे प्रयत्न केल्यानंतरही डासांचा प्रादूर्भाव कमी होत नसून, रुग्णांच्या संख्येत भरच पडत आहे.