पाणीपुरी उठली अकाेलेकरांच्या जिवावर
पावसाळ्यात साथराेगांचा फैलाव अधिक तीव्रतेने हाेताे. पाेटदुखी, उलटी हाेणे, छातीत जळजळ यांसह टायफाइडच्या प्रसाराला पाणीपुरी कारणीभूत ठरत आहे. याठिकाणी तयार केल्या जाणाऱ्या तिखट पाण्यात विक्रेता अनेकदा हात बुडवताे. हात पुसण्यासाठी मळकट कापडाचा वापर करताे. हीच पाणीपुरी अकाेलेकरांच्या जिवावर उठल्याचे डाॅक्टर सांगतात.
डेंग्यूसदृश साथीला आळा नाहीच!
छतावरील किंवा अडगळीत पडलेले जुने टायर, फुलदानी, कुलर तसेच घरात किंवा परिसरात ज्या ठिकाणी पाणी तुंबून आहे, त्याठिकाणी डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती हाेते. हा आजार टाळण्यासाठी नागरिकांनी एक दिवस काेरडा पाळण्याची गरज असून, यासंदर्भात मनपाकडूनही जनजागृतीकडे पाठ फिरविण्यात आल्याचे चित्र आहे.
अकाेलेकरांचा वाली काेण?
शहरात जीवघेण्या डेंग्यूसदृश व टायफाइडची साथ पसरली आहे. अशावेळी सत्ता पक्षाने मनपाच्या हिवताप विभागाला धुरळणी व फवारणी करण्याचे निर्देश देणे क्रमप्राप्त आहे. आजराेजी शहराच्या प्रत्येक भागात अस्वच्छतेने कळस गाठला असून, अकाेलेकरांना साथराेगांनी त्रस्त करून साेडले आहे. त्यामुळे अकाेलेकरांचा वाली काेण, असा सवाल उपस्थित झाला आहे.