कृषी विभागामार्फत माहिती तंत्रज्ञानाविषयक केंद्र-राज्य पुरस्कृत विविध प्रकल्प व उपक्रम राबविले जातात. या प्रकल्पांची माहिती शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर मिळण्यासाठी राज्यात कृषी विभागाकडून ई गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात आला. हा प्रकल्पात आज्ञावालींच्या वापरासाठी आणि माहिती अद्ययावत करण्यासाठी तालुका स्तरापर्यंत संगणक साहित्याचा वापर सुरू झाला. त्यासाठी इंटरनेटची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये क्षेत्रीय स्तरावरून सध्याची व लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यात येऊन योजनानिहाय, घटकनिहाय राज्य ते तालुका अहवाल उपलब्ध करून देण्यात येत होते. कामातील वारंवारिता टाळून वेळेची बचत, एकाच ठिकाणी माहितीची उपलब्धता होत असल्याने शेतकरी व शेतीसोबत जुळलेल्या घटकांसाठी सहा संकेतस्थळे सुरू करण्यात आली. यातील काही संकेतस्थळे योग्यरीत्या सुरूही झाले. मात्र आता यातील चार संकेतस्थळे बंद पडली आहेत.
--बॉक्स--
बंद असलेली चार संकेतस्थळे
ऑनलाईन पावसाची माहिती मिळविण्यासाठी महत्त्वाचे असलेले महारेन, बियाणे, खते व कीटकनाशके या कृषी निविष्ठाची विक्री व उत्पादन करण्यासाठी लागणारा परवाना ऑनलाईन मिळविण्यासाठी महाॲग्री आयक्यूसी, पिकावरील कीड अथवा रोग सर्वेक्षण व सल्ला मिळविण्यासाठी एनसीआयपीएम प्रकल्प, हंगामातील आठवडानिहाय पीक लागवडीखालील क्षेत्राची ऑनलाइन माहितीसाठी महाॲग्री डॉट जीवोव्ही हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले होते; मात्र ही चार संकेतस्थळे बंद आहे.