नांदुरा (जि. बुलडाणा): गत वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी तालुक्यातील शेतकरी बियाण्यांसाठी पायपीट करत आहे. मात्र त्याचवेळी दुसरीक डे तालुका कृषी कार्यालयाच्या गोदामात खासगी बियाणे कंपनीचे कपाशीचे शेकडो डबे वितरित न झाल्यामुळे पडून आहे. हा भंडाफोड सभापती अनिल इंगळे व पंचायत समिती पदाधिकार्यांनी १८ जुलैच्या दुपारी कृषी विभागाच्या गोदामाची झाडाझडती घेऊन केला.तालुका कृषी कार्यालयाचे राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या गोदामात शेतकर्यांना वितरित न केलेले खासगी कंपनीच्या कपाशी बियाण्यांचे सुमारे पंधराशे डबे पडून असल्याची माहिती पंचायत समिती पदाधिकार्यांना समजली. त्यानुसार सभापती अनिल इंगळे, पं.स. सदस्य अर्चना शिवाजीराव पाटील, संतोष डिवरे, गणेश भोपळे सदस्य दुष्काळ निवारण समिती आदींनी तालुका कृषी कार्यालयाच्या गोदामाची झाडाझडती घेतली असता कपाशी बियाण्याचे पंधराशे डबे व देशी कपाशीचे बियाणे वितरित न केल्या गेल्यामुळे पडून असल्याचे दिसून आले. तालुक्यातील पेरण्या आता अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे आता पडून असलेल्या बियाण्यांचा फायदा काय? असा प्रश्न पंचायत समिती पदाधिकार्यांनी उपस्थित केला. यावेळी पंचायत समिती पदाधिकार्यांनी तालुका कृषी अधिकार्यांसोबत मोबाइलवरून संपर्क केला असता, ते महत्त्वाच्या बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले. हे महागडे कपाशीचे बियाणे शेतकर्यांना मिळाले असते तर त्यांना या विपरीत परिस्थितीत या बियाण्यांचा पेरणीसाठी मोठा आधार झाला असता. मात्र कृषी विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सदर बियाणे पडून आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून वरिष्ठांनी तत्काळ संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी पंचायत समिती पदाधिकार्यांनी केली आहे. महिनाभरापूर्वीच झाली कपाशीची लागवडगोदामात पडून असलेल्या खासगी कंपनीच्या बिटी बियाण्यांची बागायती शेतीत लागवड केली जाते, ती प्रामुख्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात. त्यानुसार अशा वेळीच तालुक्यात कपाशीची लागवड झाली आहे. तर आता सोयाबीन व तुरीची लागवड शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे वितरित न झालेल्या बियाण्याची आता उपयोगीता काय? कृषी विभागाने बियाणे पेरणीच्या वेळेवर का वितरित केले नाही, आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.सदर बियाणे जे शेतकरी बँकेचे थकबाकीदार असून, त्यांना कर्ज मिळाले नाही, त्यांना वितरित केले जात आहे. हे बियाणे दहा दिवसांपूर्वीच प्राप्त झाले आहे.- एम.पी. स्वामी, प्रभारी तालुका कृषी अधिकारी नांदुरा.
कृषी विभागाच्या गोदामात कपाशी बियाण्याचे शेकडो डबे पडून
By admin | Published: July 18, 2016 11:39 PM