अकोला: शहरात स्वाइन फ्ल्यू आजाराने उग्र रूप धारण केल्याची जाणीव होताच महापौर विजय अग्रवाल यांनी सोमवारी सकाळी ७ वाजता मनपाच्या वैद्यकीय आरोग्य व मलेरिया विभागाचा आढावा घेतला. संबंधित अधिकार्यांकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे पाहता महापौरांनी अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी केली. मलेरिया विभागाच्या अखत्यारित असलेल्या गोडाउनची पाहणी केली असता औषधसाठा व पुस्तिकेच्या नोंदीत तफावत आढळून आली. अखेर याप्रकरणी उपायुक्त समाधान सोळंके यांना माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.राज्याच्या विविध भागात डोके वर काढणार्या संसर्गजन्य स्वाइन फ्ल्यू आजाराचे लोण आता शहरातही पोहोचल्याचे दिसत आहे. आजपर्यंत शहरात या आजाराचे अकरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असताना महापालिकेचा वैद्यकीय आरोग्य विभाग, स्वच्छता विभाग, मलेरिया विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे. लोकमतने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर महापौर विजय अग्रवाल यांनी रविवारी रात्री ९ वाजता तसेच सोमवारी सकाळी ७ वाजता आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सोमवारी सकाळी दक्षिण झोनस्थित मनपाच्या संकुलमध्ये मलेरिया विभागाची आकस्मिक पाहणी केली असता ३२ कर्मचार्यांपैकी तब्बल १६ कर्मचारी गैरहजर आढळून आले. तर उर्वरित कर्मचारी उशिरा पोहोचले. शहरात डासांचा प्रकोप वाढला असताना मलेरिया विभागाकडून नियमित फवारणी, धुरळणी होत नसल्याची परिस्थिती आहे. महापौर विजय अग्रवाल यांनी या विभागाच्या गोडाउनची पाहणी केली असता उपलब्ध औषध साठा तसेच साठा पुस्तिकेच्या नोंदवहीत मोठय़ा प्रमाणात तफावत आढळून आली. मलेरिया विभागाचे पर्यवेक्षक अरुण टापरे यांनी दिलेली माहिती असंबद्ध असल्याचे समोर येताच महापौर विजय अग्रवाल यांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली. एकूणच नागरिकांच्या आरोग्याप्रती मनपाचा आरोग्य विभाग कमालीचा उदासीन असल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात महापौर अग्रवाल यांनी मनपा आयुक्त अजय लहाने यांच्यासोबत चर्चा करून मलेरिया विभागाची घडी सुधारण्यासह स्वाइन फ्ल्यू आजाराला आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले.
आरोग्य विभागाची झाडाझडती!
By admin | Published: April 11, 2017 1:50 AM