अकोला: महापालिकेच्या स्वच्छता विभागातील तीन महिला सफाई कर्मचार्यांनी बनावट आरोग्य प्रमाणपत्र सादर करून सेवानवृत्ती घेतल्याप्रकरणी प्रशासनाने सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात १२ फेब्रुवारी रोजी तक्रार नोंदवली होती. या प्रकरणातील सेवानवृत्त झालेल्या मात्र प्रशासनाने पुन्हा कामावर नियुक्त केलेल्या सफाई कर्मचारी भारती संतोष ढोलकर यांची विभागीय चौकशी करण्याचा निर्णय पालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे. स्वच्छता विभागात सफाई कर्मचारी पदावर कार्यरत कर्मचार्यांना दुर्धर आजार जडल्यास ऐच्छिक सेवानवृत्ती घेऊन कुटुंबातील नामनिर्देशित व्यक्तीच्या नियुक्तीची शिफारस प्रशासनाकडे करता येते. सेवानवृत्तीसाठी सक्षम वैद्यकीय आरोग्य अधिकार्यांचे आरोग्य प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. या नियमानुसार महिला सफाई कर्मचारी किरण निंदाने, लता रिल व भारती ढोलकर यांनी सेवानवृत्तीचे प्रकरण मनपात सादर केले होते. तीनही कर्मचार्यांनी सवरेपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक यांचे आरोग्य प्रमाणपत्र सादर केले. प्रमाणपत्राबाबत आयुक्तांना शंका आल्याने त्यांनी कर्मचार्यांनी सादर केलेले प्रमाणपत्र पडताळणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे पाठवले. शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार असे कोणतेही प्रमाणपत्र जिल्हा सवरेपचार रुग्णालयातून देण्यात आले नसल्याचे कळवले. ही गंभीर बाब ध्यानात घेता आयुक्त अजय लहाने यांनी तीनही महिला सफाई कर्मचार्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्याचे निर्देश सहायक आयुक्त राजेंद्र घनबहाद्दूर यांना दिले होते. घनबहाद्दूर यांच्या मार्गदर्शनाखाली १२ फेब्रुवारी रोजी पोलीस तक्रार नोंदवण्यात आली. यादरम्यान, आयुक्त लहाने यांनी भारती ढोलकर या महिला कर्मचार्याची सेवानवृत्ती रद्द करून त्यांना पुन्हा कामावर नियुक्त केले. तसेच विभागीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बनावट प्रमाणपत्र प्रकरणात विभागीय चौकशी
By admin | Published: July 07, 2016 2:24 AM