लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासकीय कामात भ्रष्टाचार करणे, नियमबाह्य पद्धतीने चुकीच्या पदांवर ठाण मांडण्यासोबतच प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरणे, बनावट आरोग्य प्रमाणपत्राच्या आधारे महापालिकेत सेवानवृत्तीसाठी प्रशासनाची दिशाभूल करणे आदींसह विविध प्रकरणात मनपा कर्मचार्यांची विभागीय चौकशी करण्यात आली. विभागीय चौकशीचे अहवाल तयार करून पुढील कारवाईसाठी मनपा आयुक्तांकडे सादर करणे अपेक्षित आहे. पंरतु चौकशी पूर्ण करणार्या वरिष्ठ अधिकार्यांकडून अहवाल सादर करण्यास विलंब होत असल्यामुळे सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महापालिकेच्या विविध विभागात काम करणार्या कामचुकार, भ्रष्ट प्रवृत्तीसह प्रशासनाची दिशाभूल करून फसवणूक करणार्या कर्मचार्यांचे पितळ उघडे पडल्यानंतर संबंधितांची विभागीय चौकशी करण्याचा आदेश मनपा आयुक्त अजय लहाने यांनी दोन वर्षांपूर्वी दिले होते. यामध्ये प्रामुख्याने शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वच्छता व आरोग्य विभागातील कर्मचार्यांचा समावेश आहे. शिक्षण विभागातील एक सहायक शिक्षिक ा आणि आरोग्य विभागातील आठ सफाई कर्मचार्यांची विभागीय चौकशी करण्याची जबाबदारी मनपा उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सोपवण्यात आली होती. कौलखेड परिसरातील शिव उद्यानच्या बांधकामात आर्थिक घोळ केल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील एका कर्मचार्याची विभागीय चौकशी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्याकडे सोपवली होती. यासोबतच मनपाचे तत्कालीन आयुक्त चंद्रशेखर रोकडे यांच्या कालावधीत एका सहायक महिला शिक्षिकेला नियमबाह्यरीत्या वरिष्ठ पदावर पदोन्नती दिल्याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे निर्देश मनपा उपायुक्त सुरेश सोळसे यांना दिले होते. या संपूर्ण प्रकरणी महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याकडे आजपर्यंंत एकही चौकशी अहवाल सादर करण्यात आला नाही, येथे उल्लेखनीय.
अहवाल सादर करण्यास विलंब का?अधिकार्यांच्या सोयीचे विषय असतील, तर ते झटपट निकाली काढल्या जातात. त्यासाठी आकाश-पातळ एक केल्या जाते. प्रशासनाची दिशाभूल करणे, नियमबाह्य पदांवर ठाण मांडणे, आर्थिक घोळ करणार्या कर्मचार्यांची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. या ठिकाणी वर्षभरापासून अहवाल सादर करण्यास विलंब होत असल्यामुळे शंका-कुशंकांना बळ मिळत आहे.
कर्मचारी बदलीच्या प्रतीक्षेत!ज्या कर्मचार्यांचे चौकशी अहवाल तयार आहेत, त्यांनी महापालिका आयुक्त अजय लहाने यांच्याकडे चौकशी अहवाल विलंबाने सादर व्हावा, यासाठी प्रयत्न चालविल्याची माहिती आहे. यादरम्यान, आयुक्त लहाने यांची बदली होईल आणि सर्वकाही सुरळीत होईल, अशी अनेकांना अपेक्षा असल्याची चर्चा मनपा वतरुळात सुरू आहे.
संबंधित अधिकार्यांना विभागीय चौकशीचे अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. अहवाल प्राप्त होताच पुढील निर्णय घेण्यात येतील. -अजय लहाने, आयुक्त मनपा.