अकोला : पाथर्डी येथील शेतकर्याकडून राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेच्या पीक पेरणी प्रमाणपत्रासाठी ५१0 रुपयांची लाच स्वीकारणारा तलाठी संजय तायडे याला गुरुवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात पाठवण्याचा आदेश दिला. पाथर्डी येथील शेतकर्याला अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरी फाटा शाखेत अर्ज करावयाचा असल्याने तलाठी संजय तायडे याच्याकडे पीक पेरणी प्रमाणपत्रासाठी १७ जुलै रोजी रीतसर अर्ज दिला. मात्र, तलाठय़ाने सदर शेतकर्यास प्रमाणपत्र देण्यासाठी ५१0 रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणाची तक्रार शेतकर्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. बुधवारी दुपारी शेतकरी लाचेची रक्कम ५१0 रुपये घेऊन तलाठी संजय तायडे याच्या पाथर्डी येथील कार्यालयात गेले असता तलाठय़ाने सदरची रक्कम कार्यालयात उपस्थित असलेल्या एका शेतकर्यास देण्यास सांगितले. यावेळी दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी लाचखोर तलाठय़ाला रंगेहात पकडले. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला कारागृहात पाठविण्याचा आदेश दिला.
लाचखोर तलाठय़ाची कारागृहात रवानगी
By admin | Published: July 24, 2015 11:46 PM