अकोला : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत जिल्ह्यातील ८४ खेडी आणि ६४ खेडी या दोन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांपोटी जुलैअखेरपर्यंत ६४ लाख ५० हजार ९०० रुपयांची थकबाकी पंधरा दिवसांत जमा करा, अन्यथा दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरणमार्फत जिल्हा परिषदेला ३० ऑगस्ट रोजीच्या नोटीसद्वारे देण्यात आला.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि अकोला तालुक्यातील खांबोरा येथील ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चालविण्यात येते. या दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या वीज देयकांची ६४ लाख ५० हजार ९०० रुपयांची रक्कम थकीत आहे. त्यामध्ये ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या वीज देयकापोटी ४५ लाख ४६ हजार ७३० रुपये आणि ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या वीज देयकापोटी १९ लाख ४ हजार १७० रुपयांच्या थकीत रकमेचा समावेश आहे.
थकीत पाणीपट्टी वसुलीची
आजपासून मोहीम !
जिल्ह्यातील ६४ खेडी आणि ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद होण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर थकीत वीज देयकांचा भरणा करण्यासाठी दोन्ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत थकीत पाणीपट्टी वसूल करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागासह अकोला व अकोट पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार पाणीपट्टी वसूल करण्याची मोहीम आज, शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार आहे.