राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बाळापूर तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद कार्यक्रम महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी यशोमती ठाकूर म्हणाल्या, मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढवलेले नव्हते. या कामाला ४५० रुपये मिळत होते. आपण त्यात वाढ करून ११२५ रुपये केले. यासाठी किमान २५०० रुपये मिळायले हवे अशी माझी इच्छा आहे. तसा प्रस्तावही आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविला. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार काही आम्हाला साथ देत नाहीत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत मदत केल्यास त्यांचीही साथ मिळेल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. या कार्यक्रमात त्यांनी मुरलीधर राऊत यांच्या कार्याचे कौतुकही केले.
कार्यक्रमाला माजी गृहमंत्री माणिकराव ठाकरे यांच्यासह अशोक अमानकर, डाॅ. सुधीर ढोणे, हिदायत पटेल, नतिकोद्दीन खतीब, अनीस अहमद, अविनाश देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करणार - बाळासाहेब थोरात
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. यासंदर्भात मुंबई येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांवर झालेला अन्याय लवकरच दूर करू, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच उच्चदाब विद्युत मनोऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.