अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी मध्यंतरी उपायुक्त विजयकु मार म्हसाळ यांना देयकांना मंजुरी देण्याचे सर्वाधिकार बहाल केले होते. नेमकी हीच बाब बांधकाम विभागातील कर्तव्याचा सतत ‘गजर’ करणाºया कर्मचाºयाच्या जिव्हारी लागली. कंत्राटदारांच्या फाइलवर उपायुक्त म्हसाळ यांनी उलट टपाली कोणतेही प्रश्न उपस्थित न करता स्वाक्षरी करावी, यासाठी आग्रही असणाºया संबंधित काडीबाज कर्मचाºयाने उपायुक्त म्हसाळ यांना अडचणीत आणण्याचे पुरेपूर प्रयत्न केल्याची माहिती आहे. त्यामुळे की काय, उपायुक्त विजयकुमार म्हसाळ दीर्घ रजेवर गेल्याची खमंग चर्चा मनपात रंगली आहे.महापालिकेने मर्यादित अधिकार दिले की शासनाचे अधिकारी प्रशासकीय कामकाज करताना हात आखडता घेतात, हे सर्वश्रुत आहे. मनपाच्या उपायुक्त पदाची विजयकुमार म्हसाळ यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज सोपविण्यात आले होते. यादरम्यान त्यांनी प्रशासकीय कामकाज व्यवस्थितरीत्या सांभाळले. त्यावेळी मानधन तत्त्वावर नियुक्त केलेले उपायुक्त प्रमोद कापडे (विकास) यांना बांधकाम विभागामार्फत होणाºया विकास कामांच्या देयकांना मंजुरी देण्याचे अधिकार नव्हते. कंत्राटदारांच्या देयकांना मंजुरी देण्याचा अंतिम अधिकार मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी राखून ठेवला होता. यादरम्यान अचानक प्रमोद कापडे यांनी महापालिकेला रामराम ठोकला. योगायोगाने उपायुक्त पदासाठी शासनाने रंजना गगे यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांची प्रशासकीय कामकाज करण्याची हातोटी, प्रलंबित विषयांना निकाली काढण्याची पद्धत लक्षात घेता अवघ्या तीन महिन्यांपूर्वी आयुक्त संजय कापडणीस यांनी उपायुक्त म्हसाळ यांच्याकडे कंत्राटदारांच्या देयकांना मंजुरी देण्याचे अधिकार बहाल केले. तसेच पाच लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याचा अधिकार प्रदान केला. उपायुक्त म्हसाळ यांना प्रशासकीय कामाचा पूर्वानुभव असल्यामुळे त्यांनी बांधकाम विभागाची जबाबदारी सांभाळणाºया प्रभारी अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांनी मंजूर केलेल्या फायलींमध्ये त्रुटी काढताच ही बाब संबंधित प्रभारी अधिकारी व कनिष्ठ अभियंत्यांच्या जिव्हारी लागल्याचे बोलल्या जाते.आयुक्तांची दिशाभूल; कंत्राटदारांना खडेबोलहद्दवाढीतील विकास कामे असो वा शहरातील विकास कामांच्या फायलींमध्ये विविध प्रकारच्या तांत्रिक त्रुटी असल्याने फायली मंजूर करता येत नाहीत, या मुद्यावरून प्रभारी अधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची सातत्याने दिशाभूल केल्याची माहिती आहे. तसेच उपायुक्त म्हसाळ यांच्याकडे जाणाºया फायली व कंत्राटदारांची ये-जा वाढल्याने संबंधित अधिकाºयाने कंत्राटदारांना खडेबोल सुनावल्याची चर्चा आहे. या प्रकारामुळेही उपायुक्त म्हसाळ अस्वस्थ होते, असे बोलल्या जात आहे.
‘थर्ड पार्टी’चा तिढा निर्माण केला!बांधकाम विभागाचे कामकाज सांभाळणाºया प्रभारी अधिकाºयाने हद्दवाढीतील विकास कामांच्या कोट्यवधींच्या देयकांना ‘त्रयस्थ एजन्सी’ने अहवाल दिल्यानंतरच देयक अदा करण्याच्या मुद्यावरून जाणीवपूर्वक आडकाठी निर्माण केली होती. या विषयावर उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्यासोबत चर्चेतून मार्ग काढणे शक्य असतानाही फायली मंजूर न करण्याची हेकेखोर भूमिका कायम ठेवली. अर्थात, उपायुक्त म्हसाळ यांच्यासमोर कायदेशीर पेच निर्माण केला.