लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महानगरात सर्वत्र डासांचा प्रादुर्भाव झालेला असताना महापालिकेतील मलेरिया विभाग करतो तरी काय, असा प्रश्न करून उपमहापौर वैशाली शेळके यांनी संपूर्ण विभागालाच धारेवर धरले. डास, अळीनाशक फवारणी करण्याचे आदेशही त्यांनी याप्रसंगी डॉ.अस्मीता पाठक यांना दिले.अकोला महानगरपालिक ा अंतर्गत डास, अळीनाशक फवारणी संपूर्ण शहरात प्रभागनिहाय मलेरिया विभाग करीत असते. यासाठी कर्मचाऱ्यांचे विभागनिहाय वेळापत्रकही आहे; मात्र हे सर्व करूनही डासांचा प्रादुर्भाव कसा, असा प्रश्न उपस्थित करून मलेरिया कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. उपमहापौर वैशाली शेळके यांनी मलेरिया विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना कक्षात बोलावून त्यांच्या कामाचा आढावा घेतला. जीवशास्त्रज्ञ डॉ.अस्मिता पाठक यांच्याकडून माहिती घेतली. प्रत्येक कर्मचाऱ्याने नगरसेवकांच्या संपर्कात राहून काय काम करीत आहे, याची माहिती द्यावी, अशा सूचना उपमहापौर शेळके यांनी दिल्यात. यासाठी मलेरिया कर्मचाऱ्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक नोंदवून नगरसेवकांच्या संपर्कात आणावेत, असेही उपमहापौर यांनी येथे आदेश दिलेत. बैठकीला नगरसेवक धनंजय धबाले, शशिकांत चोपडे, डॉ.अस्मिता पाठक, टापरे, पी.ए.चिंचोळकर, एस.जी.झासकर, मो.सलिम अब्दुल रशीद, पंजाबराव लोहपुरे, प्रकाश राठोड, गजानन माथने आणि मलेरिया विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
मलेरिया विभागाला उपमहापौरांनी धरले धारेवर!
By admin | Published: July 15, 2017 1:24 AM