अकोला, दि. ३0-शहरात भाजप, शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांचा ओढा असल्याचे चित्र दिसत आहे. महापालिका निवडणुकीसाठी संबंधित पक्षांकडे दावेदारी केल्यानंतर आपल्या पदरात तिकीट मिळते की नाही, या विचारातून इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. महापालिकेकडे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होऊन चार दिवसांचा अवधी उलटला असताना अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर न केल्यामुळे राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत यंदा प्रथमच शिवसेना व भाजप आमने-सामने लढणार आहेत. दोन्ही पक्षांनी आजपर्यंत युतीच्या माध्यमातून निवडणूक लढल्यामुळे कोणाची नेमकी ताकद किती, याचा अंदाज लागत नव्हता. यावेळी मात्र दोन्ही पक्षांची ताकद निवडणुकीच्या माध्यमातून दिसून येईल. भाजप-सेनेची युती तुटण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वबळाच्या वल्गना केल्या जात होत्या. युती तुटताच काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडीच्या मुद्यावर बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार २७ जानेवारीपासून नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली. विविध राजकीय पक्षांकडून अधिकृतपणे निवडणूक लढविणार्या इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी मनधरणी चालवली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला चार दिवसांचा कालावधी होत असताना अद्याप कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली नसल्याचे चित्र आहे. बंडखोरीचा फटका टाळण्यासाठी उमेदवारी यादी २ किंवा ३ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाते की काय, अशी शंका असल्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. यामध्ये ज्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे, असा विश्वास वाटणार्या उमेदवारांनी प्रचार सभा घेण्याचा धडाका लावल्याचे दिसून येते. बंडखोरी, दगाफटका टाळण्यासाठी विलंबप्रत्येक पक्षाकडे इच्छुकांची मोठी यादी आहे. त्यातील निवडून येणार्या निकषात कोण बसतो, हे निश्चित नसल्याने आणि पक्षांतर्गत मतप्रवाह असल्यामुळे भाजप-शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह भारिपने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत लक्षात घेता त्यापूर्वी उमेदवार यादी घोषित केल्यास बंडखोरी व दगाफटका होण्याची शक्यता आहे. हा प्रकार टाळण्यासाठी यादीला विलंब केला जात असल्याचे दिसून येते. विजयाची खात्री देणार्यांचा शोध सुरूचमहापालिकेची निवडणूक यावेळी प्रथमच भाजप आणि शिवसेना स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीच्या मुद्यावर वाटाघाटी सुरू आहे. भारिप-बहुजन महासंघानेदेखील यंदा कोणत्याही पक्षासोबत हातमिळवणी न करता निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणार असल्याने प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीत तगडे आव्हान देऊन विजय प्राप्त करणार्या उमेदवारावर दाव लावल्या जात आहेत. शहरातील जाती-पातीचे समीकरण लक्षात घेता सर्वच पक्षाकडून विजयाची हमी देणार्या उमेदवारांचा अद्यापही शोध घेतला जात असल्याची माहिती आहे.अनेक पक्षांकडे मागितली उमेदवारी!भाजप-सेनेची युती तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी व भारिपची आघाडी गृहीत धरून काही बहाद्दरांनी सर्वच राजकीय पक्षांच्या मुलाखतींना हजेरी लावून उमेदवारी मागितली आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याच पक्षाने उमेदवारी यादी जाहीर न केल्यामुळे इच्छुकांची कोंडी झाली आहे.
तिकिटासाठी इच्छुकांचा जीव टांगणीला
By admin | Published: January 31, 2017 2:17 AM