लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मनपा महिला व बालकल्याण विभागामार्फत मनपा विद्यार्थ्यांच्या सायकल खरेदीसाठी निधीचा ठावठिकाणा नसताना मुख्याध्यापकांनी तब्बल ५३ लाख रुपयांच्या सायकलची खरेदी केल्याचा गौप्यस्फोट, शनिवारी स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी केला. यामध्ये शिलाई मशीनची विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून सायकल खरेदी करण्यात आल्याने मनपाचा शिक्षण व महिला बालकल्याण विभाग संशयाच्या घेºयात सापडला आहे.‘जिओ टॅगिंग’ न करता कागदोपत्री शौचालये उभारून त्या बदल्यात २८ कोटी रुपयांची देयके उकळण्यात आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता मनपा शाळेतील इयत्ता पाचवी ते सातवीमधील विद्यार्थ्यांसाठी खरेदी केल्या जाणाºया सायकलप्रकरणी मोठा घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. महिला व बालकल्याण समिती सभापती मनीषा भन्साली यांनी मनपा शाळेतील इयत्ता पाचवी, सहावी व सातवीमध्ये शिक्षण घेणाºया १ हजार ९४८ विद्यार्थ्यांना सायकलीचे वाटप करण्यासाठी ८७ लाख ६६ हजार रुपयांची तरतूद प्रस्तावित केली होती. हा प्रस्ताव स्थायी समितीने स्थगित ठेवल्यानंतरही मनपा शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना सायकल खरेदीचे निर्देश दिले. खरेदी केलेल्या सायकलची पावती शिक्षण विभागाकडे सादर करण्यात आल्याचे समोर आले आहे. स्थायी समितीने सायकल खरेदीसाठी ८७ लाख रुपयांचा प्रस्ताव बाजूला सारल्यानंतरही मुख्याध्यापकांनी ५३ लाख रुपयांच्या सायकलची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती स्थायी समिती सभापती सतीश ढगे यांनी शनिवारी ‘लोकमत’ला दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता शिक्षण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचारी व मुख्याध्यापकांची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सतीश ढगे यांनी केली आहे.
सायकल मिळाली नाही तर पैसे परत!सायकल मिळाली नाही तर पैसे परत देऊ, असे सांगत मुख्याध्यापकांनी गरीब पालकांजवळून पैसे जमा केल्याची माहिती आहे. शिलाई मशीन विक्रेत्याकडून सायकल खरेदी टिळक रोडवरील त्रिवेणेश्वर कॉम्प्लेक्समधील ह्यनॅशनल शिलाई मशीनह्ण एजन्सीकडून केल्याचा प्रकार समोर आला आहे. याव्यतिरिक्त डाबकी रोड भागातील रामदेव बाबा मोटर्स तसेच मोहम्मद अली रोड भागातील न्यू भारत एजन्सीमधून सायकलची खरेदी करण्यात आली.सदर प्रकरणाची गंभीरतेने दखल घेण्यात आली आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषी आढळून येणाºयावर निश्चितच कठोर कारवाई केली जाईल.- संजय कापडणीस,आयुक्त, मनपा