अकोला, दि. १७- अतिरिक्त ठरलेल्या ११७ पैकी ५९ शिक्षकांचे शिक्षणाधिकारी स्तरावर समायोजन करण्यात आले; परंतु त्यातील ११ शिक्षकांना अद्यापपर्यंंत एकाही शाळेने रुजू करून घेतले नाही आणि आता या शिक्षकांचे पाच महिन्यांपासूनचे मूळ आस्थापनेवरील वेतन रोखण्यात आले आहे. शिक्षण आयुक्तांनी मूळ आस्थापनेवरूनच अतिरिक्त शिक्षकांचे वेतन देण्याचा आदेश दिल्यानंतरही शिक्षकांना वेतनासाठी पाच महिन्यांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्हय़ात ११७ शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यापैकी ५८ शिक्षकांचे शिक्षणाधिकारी स्तरावर समायोजन करण्यात आले. दरम्यान, या शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेमधून कार्यमुक्त करण्यात आले आणि शाळांवर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले; परंतु अद्यापही ११ शिक्षकांना रुजू करण्यात आले नाही. या ११ अतिरिक्त शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्यापर्यंंत मूळ आस्थापनेवरून वेतन निघत होते; परंतु ११ शिक्षकांचे मूळ आस्थापनेवरील वेतन अचानक बंद करण्यात आले. गत पाच महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षकांना वेतन मिळत नसल्याने, त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्ज काढून त्यांना कुटुंबाचा खर्च भागवावा लागत आहे. एकीकडे आमचे समायोजन करूनही आम्हाला रुजू करून घेतले जात नाही आणि दुसरीकडे आमचे मूळ आस्थापनेवरील वेतन थांबवून शासन आमच्यावर अन्याय करीत आहे. शिक्षण आयुक्तांनी अतिरिक्त शिक्षकांचे वेतन विभागीय शिक्षण उपसंचालकांनी वेतन मूळ शाळेतून तात्पुरत्या स्वरूपात काढण्याचा आदेश दिला होता; परंतु त्या आदेशाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे. वेतन व शाळेविना असलेले शिक्षकगत पाच महिन्यांपासून वेतन आणि शाळेविना असलेल्या ११ शिक्षकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. वेतन आणि शाळेपासून वंचित असलेल्या शिक्षकांमध्ये सीमा मुळे, विपीन नावकार, वंदना गोटे, रत्ना पानझाडे, शशांक मोहोड, अतुल खिरडकर, भगवान वाघ, राजश्री नागे, केशव पाटील, अविनाश मोहोकार आणि माजिद शेख यांचा समावेश आहे.
आयुक्तांच्या आदेशानंतरही अतिरिक्त शिक्षकांचे वेतन रखडले!
By admin | Published: March 18, 2017 2:35 AM