संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जीएसटीच्या अंमलबजावणीत राज्यातील मनोरंजन कर मोठ्या प्रमाणात कमी होऊनही अकोल्यातील (राधाकृष्णा) आरके टॉकिजचे तिकीट दर कायम आहेत. चित्रपटगृहाचे मालक-जीएसटी अधिकाऱ्यांच्या संभ्रमात अकोलेकरांना या कायद्याचा प्रत्यक्ष लाभ झालेला दिसत नाही. जुलै महिन्यापासून देशभरात (वस्तू व सेवा कर) लागू झाला. जीएसटीच्या नवीन धोरणात राज्यातील चित्रपटगृहांतील शंभराच्या आतील तिकिटांवर १८ टक्के आणि त्यावरील तिकिटांवर स्लबनुसार कमाल २८ टक्के कर आकारणी करण्यात येत आहे. पूर्वी राज्यातील चित्रपटगृहांच्या तिकिटावर ४० टक्के करमणूक आणि वातानुकूलित सेवेसाठी ९ टक्के असा एकत्रित मिळून जवळपास ५० टक्के कर आकारला जायचा. जीएसटीमुळे राज्यातील मनोरंजन कर खातेच गोठविले. पूर्वीच्या ४० टक्क्यांच्या तुलनेत जीएसटी २८ टक्के झाले असले तरी चित्रपटगृह संचालकांनी अजूनही तिकिटांचे दर कमी केलेले नाही. शंभर रुपयांच्या आत तिकीट असणाऱ्या अकोल्यातील चार सिंगल स्क्रिन चित्रपटगृह संचालकांनी तिकिटदरात कपात केली. त्यामुळे १० ते २० रुपयांनी तिकीट स्वस्त झाले; मात्र या तुलनेत चार स्क्रिन चालविणाऱ्या अकोल्यातील राधाकृष्ण टॉकिजच्या संचालकांनी तिकीट दरात कपात केलेली नाही. १००, १४०, १६० आणि १८० च्या दराप्रमाणे येथे तिकीट विक्री सुरू आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर तिकिटातील मनोरंजन कर वगळून त्या ठिकाणी एसजीएसटी आणि सीजीएसटी मिळून २८ टक्के रकमेची जुळवाजुळव तेवढी संचालकांनी केली आहे; मात्र जीएसटीत कमी झालेला कर ग्राहकाच्या दृष्टीस पडत नाही. जर सिंगल स्क्रिनच्या चित्रपटगृहाच्या तिकीट दरात कपात झाली तर मल्टीपेल्सच्या तिकीट दरात का नाही, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जातो आहे.पूर्वीदेखील आरके टॉकिजचे दर ऐवढेच होते. जीएसटीमध्ये फार काही बदल झालेला नाही. मूळ तिकिटाच्या २८ टक्के जीएसटी लावून तिकीट दर ठरविलेले आहे. उत्कृष्ट सेवेचे दर काय लावावे, याबाबत अद्याप जीएसटी अधिकाऱ्यांकडून कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाही.- राजेंद्र पवार, व्यवस्थापक आरके टॉकिज, अकोला.जीएसटी कायद्याच्या सेक्शन १७१ कलमांन्वये पूर्वीच्या वस्तूंच्या किं वा एखाद्या तिकीट दराच्या किमतीत वाढ करून ग्राहकाचा लाभ लाटण्याचा प्रयत्न कुठे होत असेल तर तो गुन्हा आहे. तिकीटवाढीसंदर्भात तफावत दर्शविणारी तक्रार ग्राहकांनी केली तर त्याची चौकशी होऊ शकते.-अभिजित नागले, जीएसटी अधिकारी,
मनोरंजन कर कमी होऊनही ‘आरके’ टॉकिजचे तिकीट दर कायम
By admin | Published: July 12, 2017 1:18 AM