अकोला : कोरोनाचे संकटात अनेकजण कोरोनावर मात करण्यास यशस्वी ठरत आहे. यामध्ये बहुतांश नागरिक घरीच ठणठणीत होत आहे. मोठी उमरी भागातील अमानकर कुटुंब एक उत्तम उदाहरण आहे. या कुटुंबातील चौघे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. शेजारी व नातेवाइकांनी दिलेल्या सकारात्मक प्रोत्साहनाच्या बळावर घरीच राहून अख्ख्या कुटुंबाने कोरोनावर मात केली.
मोठी उमरी भागातील लावण्या रेसिडेन्सीमधील रहिवासी शरद अमानकर शासकीय कंत्राटदार आहेत. घरात त्यांच्या आई जि.प. माजी सभापती पद्माताई अमानकर (६२), शरद व त्यांची पत्नी रूपाली, मुलगी रिया, मिताली व मावसभाऊ महादेव मोरे असे ६ जण राहतात. शरद अमानकर यांना पाठदुखी, अंगदुखीचा त्रास अचानक सुरू झाला. यावेळी त्यांनी तातडीने कोरोना तपासणी केली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबातील इतरांची कोरोना चाचणी केली. त्यात त्यांची आई पद्माताई अमानकर वगळता बाकी सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सर्वांनी एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतला. घरात गृह विलगीकरणाची सोय असल्याने डॉक्टरांच्या परवानगीने घरीच राहण्याचा निर्णय घेतला. आई निगेटिव्ह आल्याने त्यांना नातेवाइकांच्या घरी राहण्याची सोय केली. घरात वेगवेगळ्या खोलीत शरद, त्यांची पत्नी, मुलगी व मावसभाऊ महादेव विलगीकरणात होते. घरामध्ये अंतर राखूनच संवाद होत असे. यादरम्यान शेजारी व नातेवाइकांनी सहकार्य केल्याने लवकर कोरोनामुक्त झाल्याचे शरद अमानकार यांनी सांगितले.
--कोट--
आमची एकजूटता हीच आमची शक्ती...
एक-दोन दिवस अंगदुखीचा त्रास जाणवला होता. त्यानंतर तब्येतीत सुधारणा झाली. नातेवाइकांकडून जेवणाचा डबा येत होता. त्यात काही सामान आणण्यापासून ते सकारात्मक प्रोत्साहन देण्यापर्यंत शेजारी व नातेवाइकांनी सहकार्य केले. सगळे प्रकृतीची माहिती घेत व सल्ला देत होते.
-शरद अमानकर
--कोट--
सुरुवातीला त्रास झाला, पण दोन दिवसांनंतर त्रास कमी झाला. डॉक्टरचा सल्ला, पौष्टिक आहार, जास्तीत जास्त आराम, घरातील स्वच्छता यावर भर दिला. घरात मास्क व सॅनिटायझरचा वापर केला. त्यामुळे कोरोनावर यशस्वी मात करता आली.
-रूपाली अमानकर
--कोट--
कोरोनाविरुद्धची लढाई जिंकायची आहे. असा सकारात्मक विचार आम्ही सतत केला. जेवणाचा डब्बा यूज ॲण्ड थ्रो पॅकिंगमध्ये यायचा. दिवसातून तीनदा गरम पाण्याची वाफ घेतली. जास्तीत जास्त आराम केला. घरातील स्वच्छतेवर भर दिला.
-महादेव मोरे
--बॉक्स--
वृद्ध आईची घेतली काळजी
शरद अमानकर यांची आई वेगळ्या खोलीमध्ये असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. आई निगेटिव्ह आल्याने त्यांना नातेवाइकांच्या घरी राहण्याची सोय केली. तेथे नातेवाइकांनी त्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेतली.