अकोला : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या परिस्थितीत घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण करण्याची भीती वाटत होती; मात्र संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जीव धोक्यात टाकून आरोग्य सर्वेक्षणाचे काम आम्ही सुरू ठेवले, असे अकोला शहरातील आशा वर्कर अपर्णा भातकुले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले. त्यामध्ये घरोघरी जाऊन घरातील व्यक्तींची नावे, कोणाला आजार आहे काय, घरात लहान बाळ, गरोदर महिला आहे काय आणि कोणाला दुर्धर आजार आहे काय, याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम आशा स्वयंसेविकांनी सुरू केले. वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, घरोघरी जाउन आरोग्य सर्वेक्षणाचे काम करताना भीती वाटत होती; परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी आरोग्य सर्वेक्षणाच्या आवश्यकतेची जाणीव ठेवून जीव धोेक्यात टाकून आम्ही सर्वेक्षणाचे काम सुरू ठेवले. सर्वेक्षणात माहिती घेण्याचे काम करताना प्रारंभी काही ठिकाणी वाद झाले, नागरिकांचे बोलणेही सहन करावे लागले; मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही काम सुरू ठेवले. हे काम करताना एकही दिवस सुटी घेतली नाही. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत आरोग्य सर्वेक्षणासह स्वत:सह कुटुंबाची आणि सर्वांची काळजी घ्या व मास्कचा वापर करण्याचे आशा स्वयंसेविकांकडून नागरिकांना सांगितले जात आहे. सर्वेक्षणात कोरानाची लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये पाठविण्याचे काम आम्ही करीत असल्याचेही आशा वर्कर अपर्णा भातकुले यांनी सांगितले.
मुलगा माझ्यासाठी करीत होता प्रार्थना!
कोरोना काळात आरोग्य सर्वेक्षणाचे काम करीत असताना घरी जाण्यास उशीर होत होता. त्यावेळी माझा आठ वर्षाचा मुलगा मला (आईला ) काही होऊ नये, यासाठी देवाकडे प्रार्थना करीत होता. असे अपर्णा भातकुले यांनी सांगितले. घरातील कामे आटोपून आणि सर्वांची काळजी घेऊन आम्ही कर्तव्य बजावत असल्याचेही त्या म्हणाल्या.
मानधन अत्यल्प; पण कामात खंड नाही!
आरोग्य सर्वेक्षणाच्या कामापोटी दर दिवसाला आम्हाला २०८ रुपये मानधन दिले जाते. कामाच्या तुलनेत मानधन अत्यल्प
मिळत असले तरी कोरोना काळात आरोग्य सर्वेक्षणाच्या कामात आम्ही खंड पडू दिला नाही, असे अपर्णा भातकुले यांनी स्पष्ट केले.