सिंदखेडराजा (बुलडाणा) : येथील चांदणी तलावाला घाणीचा विळखा निर्माण झाला असून, तलावाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. याकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथे येणार्या पर्यटकांना त्रास सोसावा लागतो. पर्यटन स्थळाच्या विकासासाठी शासनस्तरावरुन लाखो रुपये खर्च करण्यात येतात. परंतु प्रत्यक्षात त्या पैशातून किती पर्यटन स्थळाचा विकास होतो याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करतो. येथील चांदणी तलावाच्या चोहोबाजुंनी रस्ता तयार करुन त्यावर सिमेंटचे गट्ट बसविण्यात आले. परंतु सद्यस्थितीत हा रस्ता मोठय़ा प्रमाणात उखडला आहे. पर्यटकांसाठी लोखंडी पोल उभे करुन टिनपत्रांची छत ७ ते ८ ठिकाणी उभी करण्यात आली होती. परंतु ही छतही अज्ञात व्यक्ती कापून नेत असल्याचे दिसत आहे. चांदणी तलावाला सर्व बाजुंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सदर विद्युत रोषणाई उद्घाटनापूर्वीच बंद पडली. तलावाच्या पाण्यातही मोठय़ा प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तर तलावाशेजारी उघड्यावर अवैध मांस विक्रीची दुकाने असून या मासाचे तुकडे तलावात दिसतात. तलावाचे अस्तीत्व धोक्यात असून, याकडे पुरा तत्व विभागाचे साफ दुर्लक्ष होत आहे.
चांदणी तलावाला घाणीचा विळखा
By admin | Published: November 22, 2014 11:52 PM