लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : एका तोतया अँन्टीकरप्शनच्या अधिकार्याने बेहिशेबी मालमत्तेविषयी चौकशी करायचे सांगत, डॉक्टरला धमकावल्यानंतर डॉक्टरने तोतया अधिकार्यास चर्चेत गुंतविल्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिसांनी या तोतया अधिकार्यास गुरुवारी रंगेहात अटक केली. सदर तोतया अधिकार्यास शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. अच्चुतराव नंदू सावंत असे या तोतया अधिकार्याचे नाव आहे.डॉ. मधुसुदन बगडिया यांचे सिव्हिल लाइन्स येथील अमानखॉ प्लॉटमध्ये निवासस्थान व हॉस्पिटल आहे. बुधवारी डॉ. बगडिया हे रुग्ण तपासत असताना त्यांच्या रुग्णालयात अँन्टी करप्शनचा अधिकारी असल्याची बतावणी करून, अच्चुतराव नंदू सावंत त्यांच्याकडे आला. त्याने त्याचा परिचय दिला. तुमच्या बाभूळगाव येथील शेतात दोन कोटी रुपये आहेत. तुमच्याकडे बेहिशेबी मालमत्ता आहे. त्याची चौकशी करायची असल्याचे या तोतया अधिकार्याने डॉ. बगडिया यांना सांगितले. डॉक्टर बगडिया यांना या तोतया अधिकार्यावर संशय आल्याने, डॉक्टरांनी घाबरल्याचे नाटक करीत त्याला बसवून ठेवले. त्यानंतर अँन्टी चेंबरमध्ये जाऊन सिव्हिल लाइन्स पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणाची माहिती ठाणेदार अन्वर शेख यांना मिळताच, ते ताफ्यासह तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी या तोतया अधिकार्याची चौकशी केली असता, त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली. यामुळे त्याचा खरा चेहरा पोलिसांसमोर आला. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
साक्षी सहगलही ताब्यातआरोपी अच्चुतराव नंदू सावंत याच्यासोबत एक महिला आहे. हे दोघे सोबत असतात. त्यामुळे पोलिसांनी काही अंतरावर दबा धरून बसलेल्या साक्षी देवेंद्र सहगल नामक महिलेला ताब्यात घेतले. तिची विचारपूस सुरू असून, तिचा सहभाग काय? याविषयी पोलीस चौकशी करीत आहेत. ही कारवाई ठाणेदार अन्वर एम. शेख, पोलीस निरीक्षक संतोष अघाव यांनी केली. चुकीच्या ठिकाणामुळे बिंग फुटले!
डॉक्टरांकडे आलेला तोतया अधिकारी अच्चुतराव नंदू सावंत याने बाभूळगाव येथील शेतीचा उल्लेख केला. मात्र, डॉ. बगडिया यांची शेती बाभूळगाव शिवारात नसल्याने त्यांना संशय आला. आपण आयकर विभाग व अँन्टी करप्शन अशा दोन्ही विभागातून आलो, असे सांगितले व त्याच्या ओळखपत्रावर त्याचे नाव दिसून न आल्याने डॉ. बगडिया यांना संशय आला. याच कारणामुळे या तोतयाचे बिंग फुटले.