वाशिम : गेल्या अनेक दिवसापासुन वाशिम शहरामध्ये पोलिस असल्याची बतावणी करून इसमांना लुटणार्या आरोपीचा शोध घेण्यात डीटेक्शन ब्रँचच्या पथकाला ४ जुलै रोजी यश आले. अविनाश आश्रुबा पवार असे आरोपीचे नाव असुन त्याला न्यायालयाने ९ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे शहराभरात कौतुक होत आहे. वाशिम शहरामध्ये गेल्या १५ दिवसापासुन पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना लुटण्याच्या तीन ते चार घटना लागोपाठ घडल्या. सातत्याने घडणार्या या घटनेमुळे पोलिसांना आरोपिचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे झाले होते. स्थानिक अकोला नाका येथे १ जुलै रोजी मसला पेन येथील तहकिक या इसमाला रात्री १0:३0 वाजताचे सुमारास लुटले होते. त्यानंतर रविवार बाजारामध्ये शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी नयन अरूण बंड या विद्यार्थ्यांच्या खिशामधून रोख ३ हजार रूपये व त्याचा मोबाईल लंपास केला होता. या सर्व घटना लागोपाठ घडत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले होते. या सर्व घटनेमुळे पोलिस यंत्रणाही हतबल झाली होती. अखेर नव्यानेच स्थापन केलेल्या डीटेक्शन ब्रँचचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरिक्षक उदय सोयस्कर यांनी तपासाची सुत्रे आपल्या हाती घेतली. सोयस्कर व त्यांच्या टिमने पोलिस अधिक्षक तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनात तोतया पोलिसाचा शोध घेणे सुरू केले. अखेर तोतया पोलिस म्हणुन वावरत असलेला वाशिम तालुक्यातील काटा येथील अविनाश पवार या २३ वर्षीय युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपिची ओळख पटविण्यासाठी मसला पेन येथील फिर्यादी तहकिक व पॉलिटेक्नीकचा विद्यार्थी बंड याला पोलिस स्टेशनला बोलावून आरोपी हा पवार आहे काय याची ओळख परेड घेतली. या ओळख परेडमध्ये फिर्यांदींनी अविनाश पवार हाच आरोपी असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तोतया पोलिस पवार याला अटक करून आज ५ जुलै रोजी वाशिम येथील न्यायालयात हजर केले. न्यायाधिशांनी आरोपी अविनाश पवार याला ९ जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
‘तोतया पोलिस’ पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: July 05, 2014 11:27 PM