सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
अकोला : वातावरणातील बदलाचा आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. अनेकांमध्ये सर्दी, खोकल्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यामुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच शहरातील धुळीमुळे दमा रुग्णांचाही त्रास वाढला असून, या रुग्णांचीही दवाखान्यात गर्दी वाढल्याचे दिसून येते. संसर्गापासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.
घरगुती सिलिंडरचा हॉटेल्समध्ये वापर
अकोला : शहरातील हॉटेल्ससह उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रेत्यांकडून घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडर ग्राहकांना सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबविण्याची आवश्यकता आहे.
बाजारपेठेत अनेकांकडून बेफिकिरी
अकोला : कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीतही बाजारपेठेत गर्दी वाढतच असून अनेक जण बेफिकिरीने वावरताना दिसून येत आहे. रविवारी काला चबुतरा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. या वेळी अनेक जण विनामास्क आढळून आले. इतरांपासून सुरक्षित अंतरही राखण्यात न आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या प्रकारामुळे कोरोनाचा फैलाव वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
रस्त्यावर पार्किंग, वाहतुकीस अडथळा
अकोला : शहरातील गांधी रोडवर रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पार्किंगची सुविधा नसल्याने अनेकांनी रस्त्यावरच वाहने उभी केल्याने गांधी चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने वाहने ठेवण्यास जागाच शिल्लक राहत नाही. त्यामुळे मुख्य बाजारपेठ परिसरात नेहमीच वाहतुकीची समस्या निर्माण हाेते. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.