खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री गावाचा विकास गेल्या तीन वर्षांपासून निधीअभावी खुंटला आहे. गावातील विविध विकासकामांचा आराखडा तयार करून ग्रामपंचायतीने संबंधित कार्यालयात सदर करून वारंवार लोकप्रतिनिधींकडे निधीची मागणी केली, परंतु गेल्या तीन वर्षांपासून निधी मिळाला नसल्याने गावाचा विकास थांबला आहे.
गावातील रस्ते, पाण्याची समस्या, घरकुलांचे बांधकाम व इतर विकासकामे निधीअभावी रखडली आहेत. ग्रामस्थ विकासकामे, घरकुल, आदींबाबत ग्रामपंचायतीकडे दाद मागतात, सरपंचही विकासकामे करण्यासाठी तत्पर आहेत. परंतु, ग्रामपंचायतीकडे निधीच उपलब्ध नसल्याने गाव विकासापासून दूर असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून उमटत आहे. गावातील विकासकामे करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा सरपंच, सचिवांना धारेवर धरले. परंतु, ग्रामपंचायतीकडे निधीच उपलब्ध नाही, त्यामुळे विकासकामे रखडली असून, गावात नाराजीचे वातावरण आहे.