- संतोष येलकरअकोला : जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी मंजूर १२३ कोटी २४ लाखांच्या निधीपैकी ७९ कोटी ३० लाख २६ हजार रुपयांचा निधी खर्च झाला असला, तरी उर्वरित ४३ कोटी ९३ लाख ७४ हजार रुपयांचा निधी अद्याप अखर्चित आहे. ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दीड महिन्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जिल्हा योजनेतील रखडलेली विकास कामे दीड महिन्यात मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) १२३ कोटी २४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर निधीपैकी संबंधित यंत्रणांच्या मागणीनुसार गत जानेवारी अखेरपर्यंत ९६ कोटी ४० लाख ७२ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन विभागामार्फत वितरित करण्यात आला. वितरित निधीपैकी ७९ कोटी ३० लाख २६ लाख रुपयांचा निधी विकास कामांवर खर्च करण्यात आला असून, मंजूर निधीपैकी उर्वरित ४३ कोटी ९३ लाख ७४ हजार रुपयांचा निधी खर्च होणे अद्याप बाकी आहे. ‘मार्च एन्डिंग’ला केवळ दीड महिन्याचा कालावधी उरला असल्याने, जिल्हा वार्षिक योजनेतील रखडलेली ४३ कोटी ९३ लाख ७४ हजार रुपयांची विकास कामे दीड महिन्यात मार्गी लागणार की नाही आणि मंजूर निधी खर्च होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.