अकोला : प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भाच्या वाट्याला भोपळाच मिळाला आहे. निधी अपूर्ण असल्याचे कारण समोर करून विदर्भाच्या विकासाला चालना देणारे अनेक प्रकल्प अजुनही प्रलंबित असल्याने यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पाकडून अकोलेकरांची मोठी अपेक्षा आहे. प्रत्येक जण या रेल्वे अर्थसंकल्पाच्या घोषणेची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. देशात ठिकठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नात असलेले भारतीय रेल्वे प्रशासन देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विदर्भाच्या भूमीवर रेल्वे रुळांचे जाळे विणण्यास असर्मथ ठरले आहे. विदर्भाच्या विकासाला चालना देणारे अनेक जुने-नवीन प्रकल्प कुठे निधीअभावी, तर कुठे जमीन हस्तांतरणाच्या प्रश्नावरून रखडले आहेत. परिणामी विदर्भाच्या विकासला खीळ बसली आहे. अकोला-खंडवा रेल्वे मार्गाचे गेजपरिवर्तन हे त्यापैकीच एक. केव्हाच मंजुरात मिळालेला हा प्रकल्प पूर्वी वनविभागाच्या हस्तक्षेपामुळे आणि आता निधीअभावी रखडलेल्या या प्रकल्पाच्या कामासाठी १९३0 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. खासदार विजय दर्डा यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेला वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले खरे, मात्र काम सुरू करण्यास मुहुर्तच मिळाला नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातील लेकुरवाळी ह्यशकुंतलाह्ण ठिकठिकाणी निकृष्ट झालेल्या रेल्वे मार्गामुळे अनेकदा बंद पडली होती. ह्यशकुंतलेलाह्ण पुनरुज्जीवित करण्यासाठी अचलपूर-मूर्तिजापूर-यवतमाळ या नॅरोगेज मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा मुद्दा अजूनही शासन दरबारी अडकला आहे. विदर्भ-मराठवाडा जोडण्यासाठी चिखली-मलकापूर-खामगाव-जालनादरम्यान नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणच झाले, मात्र, प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरूवातच झालेली नाही. वाशिम-माहूर-आदिलाबाद दरम्यान देखील नवीन रेल्वे मार्गासाठी सर्वेक्षणाची घोषणा झाली होती, पण ती हवेतच विरली. या सर्व प्रकल्पांशी अकोलेकरांचा जवळचा संबंध असल्याने त्यांची पूर्तता यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात होईल, अशी आशा अकोलेकरांना आहे.
.तरच अकोल्यासह विदर्भाचा विकास शक्य
By admin | Published: July 07, 2014 12:47 AM