अकोला : जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध विकासकामांसाठी मंजूर निधी मार्चअखेरपर्यंत अखर्चित राहता कामा नये, उपलब्ध निधीतून विकासकामे मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती सावित्री राठोड यांनी रविवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला दिले.
जिल्हा परिषदेच्या रिक्त बांधकाम व शिक्षण सभापतिपदांचा अतिरिक्त प्रभार सांभाळल्यानंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष सावित्री राठोड यांनी रविवारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत कामांचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हा परिषद सत्तापक्षाचे गटनेता ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश केने, शाखा अभियंता नेमाडे, लेखा अधिकारी विनोद जगताप यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. विविध विकासकामांसाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाला प्राप्त निधी त्यामधून खर्च झालेला निधी व अखर्चित निधीचा आढावा यावेळी घेण्यात आला. मार्च अखेरपर्यंत विकासकामांचा निधी अखर्चित राहणार नाही, यासंदर्भात दक्षता घेऊन उपलब्ध निधीतून विकासकामे मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हा परिषद बांधकाम विभागाला यावेळी देण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रांची
कामे तातडीने पूर्ण करा
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती तसेच नवीन इमारत बांधकामांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरुस्ती व नवीन बांधकामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हा परिषद बांधकाम विभागाला यावेळी देण्यात आले.
........................फोटो...........................