संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) सोबतच १० टक्के रकमेपोटी गत जुलै अखेरपर्यंत जिल्हा खनिकर्म विभागाकडे ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येण्यात येणार आहेत.वाळू घाट, खदानी (खनिपट्टे) इत्यादी गौण खनिजाच्या स्वामित्वधन शुल्काची (रॉयल्टी) शंभर टक्के रक्कम शासन खात्यात जमा करण्यात येते; तर ‘रॉयल्टी’ सोबतच प्राप्त होणारी १० टक्के रक्कम जिल्हा खनिकर्म विभागाकडे जमा करण्यात येते. त्यानुसार गत १ सप्टेंबर २०१६ ते जुलै २०१९ अखेरपर्यंत गौण खनिजाच्या ‘रॉयल्टी ’सोबतच १० टक्के रकमेपोटी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा खनिकर्म विभागाकडे उपलब्ध झाला आहे. गौण खनिजाच्या ‘रायल्टी’सोबतच अतिरिक्त १० टक्के रकमेपोटी उपलब्ध या निधीतून जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत जिल्ह्यात विविध विकासकामे करण्यात येणार आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य सेवा, कौशल्य विकास, अपंग कल्याण, कृषी, स्वच्छता,भौतिक पायाभूत सुविधा इत्यादी प्रकारच्या विकासकामांचे नियोजन जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत करण्यात येणार असून, या विकासकामावर उपलब्ध निधी खर्च करण्यात येणार आहे.
कार्यकारी परिषद नियोजनास देणार मान्यता!जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेची बैठक सोमवार, १९ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाºया या बैठकीत गौण खनिज ‘रॉयल्टी’सोबतच १० टक्के रकमेतून उपलब्ध निधीतून जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या नियोजनाला मान्यता देण्यात येणार आहे.
गौण खनिज स्वामित्वधन शुल्कासोबतच १० टक्के रकमेपोटी गत जुलै अखेरपर्यंत ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा खनिकर्म विभागाकडे उपलब्ध झाला. उपलब्ध यावर्षी जिल्ह्यातील विकासकामांवर खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठान कार्यकारी परिषदेच्या बैठकीत विकासकामांच्या नियोजनाला मान्यता देण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोडजिल्हा खनिकर्म अधिकारी