अकोला : प्रती पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा सोमवारी शेगाव येथे साजरा होणार आहे. गजानन माऊलीच्या भेटीची आस लागलेल्या अकोला येथील भाविकांनी रविवारी शेगावची वाट धरली. अकोल्यातून हजारो गजानन भक्त गायगाव मार्गे शेगावला पायदळ रवाना झाले.
श्री संत गजानन महाराज माघ वद्य ७ शके १८००, (२३ फेब्रुवारी १८७८) या दिवशी बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव येथे दिगंबरावस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. त्यावेळी ते देवीदास पातूरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. हा दिवस महाराजांचा प्रकट दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. सोमवार, २५ फेब्रुवारी गजानन महाराजांचा प्रकट दिन भक्तिभावाने साजरा करण्यासाठी कौलखेड, मुकुंद नगर, देशमुख पेठ, जुने शहर, डाबकी रोड, खोलेश्वर गीता नगर आदी ठिकाणी असलेल्या ‘श्रीं’च्या मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी पहाटेपासूनच या उत्सवाला प्रारंभ होईल. काकडा आरती, महाराजांच्या मूर्तीला व पादुकांना दुग्धाभिषेक, श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण, आरती व महाप्रसाद असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. मंदिरांप्रमाणेच शहरात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्था, संघटना व भाविकांनी स्वेच्छेने महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजिले आहेत.
पायदळ वारी; रात्रभर करणार प्रवास! संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने ‘श्रीं’च्या दर्शनाच्या ओढीने हजारो गजानन भक्तांची पावले संतनगरीकडे वाटचाल करू लागली आहेत. रविवारी दुपारपासूनच हजारो अकोलेकर भाविकांनी शेगावचा मार्ग धरला. रात्रभर प्रवास करीत भाविक सोमवारी पहाटेपर्यंत शेगावात पोहोचणार आहेत. शेगावला दर्शनासाठी पायदळ वारीने जाणाºया भाविकांसाठी विविध धार्मिक, सामाजिक संस्थांच्यावतीने रविवारी चहा, पाणी, अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात आली.