लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संत बाळाभाऊ महाराज पितळे यांच्या भक्तांतर्फे दरवर्षी राज्यभर राबविल्या जाणारे श्वासानंद नामजप अभियान यावर्षी कोरोनाच्या साथीमुळे ऑनलाइन पद्धतीने झाले. या अभियानाला व्यापक प्रतिसाद मिळाला. ५ डिसेंबर रोजी मेहकरच्या श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात गुरुपीठाधीश ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या हस्ते अभियानाची साधेपणाने सांगता करण्यात आली. १९व्या शतकातील संत बाळाभाऊ महाराज उर्फ श्वासानंद माउली यांची इतिहासात ‘महाराष्ट्राच्या धर्मक्रांतीचे प्रणेते’ म्हणून ओळख आहे. त्यांच्या परंपरेचे चौथे अधिपती ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांनी गुरुगादीची धुरा सांभाळल्यानंतर श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात अनेक अभिनव उपक्रमांची भर घातली. तरुणांच्या मनावर चंगळवाद आणि व्यसनाधीनतेचा पगडा बसू नये, म्हणून आध्यात्मिक संस्कार करण्यासाठी त्यांनी नामजप अभियानाची सुरुवात केली. त्यांच्या प्रेरणेने दरवर्षी चातुर्मासात महाराजांचे भक्त मोठ्या प्रमाणात ‘ओम ब्रह्मी श्वासानंदाय नमः’ या महामंत्राचा नामजप करतात. तरुणांचा यामध्ये हिरीरीने सहभाग असतो. दरवर्षी या अभियानाच्या नोंदपुस्तिका महाराष्ट्रात सर्वत्र वितरीत केल्या जातात. गेल्यावर्षी मुंबईपासून चंद्रपूरपर्यंत ५२९ गावांतल्या भक्तांनी हे अभियान राबविले होते. मात्र यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान थेटपणे न राबविता ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. लाॅकडाऊनच्या काळात मोठी सवड मिळाल्यामुळे हजारो भाविकांनी या अभियानात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
यज्ञहवनाचा कार्यक्रम रद्द २५ नोव्हेंबरला राज्यस्तरीय अभियान समितीचे संयोजक सुरेश बोचरे, सहसंयोजक श्रीरंग सावजी, श्वासानंद सेवा मंडळाचे अध्यक्ष आशिष उमाळकर यांच्या पुढाकारातून समितीच्या सर्व सदस्यांची व्हर्च्युअल मिटिंग झाली. त्यामध्ये गर्दी टाळण्याच्या दृष्टीने दरवर्षी होणारा यज्ञहवनाचा कार्यक्रम रद्द करून अभियानाची साधेपणाने सांगता करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार श्रीक्षेत्र ज्ञानमंदिरात संत बाळाभाऊ महाराजांच्या मूळ पादुकांचे पूजन करून सद्गुरु ॲड. रंगनाथ महाराज पितळे यांच्या हस्ते श्वासानंद नामजप अभियानाची सांगता करण्यात आली.