अकाेला: काेराेनामुळे तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेल्या राजराजेश्वराचे दरवाजे साेमवारपासून भक्तांकरिता खुले झाले. त्यामुळे साेमवारी पहाटेच ‘जय भाेले, हर्र बाेला महादेव’च्या गजरात राजराजेश्वराच्या मंदिरामध्ये भक्तांनी प्रवेश करून आपला आनंद द्विगुणित केला.
मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले असले तरी सर्वच भक्तांना सरसकट प्रवेश देण्यावर निर्बंध आहेत. मंदिरात प्रवेश करताना कोराेना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे राजराजेश्वर मंदिर व्यवस्थापनाने मंदिर प्रवेशद्वारावरच भक्तांच्या शारीरिक तापमानाची तपासणी, सॅनिटायझेशनची व्यवस्था केली हाेती. दाेन भक्तांमध्ये शारीरिक अंतर कायम राहील याचीही दक्षता घेण्याच्या सूचना सेवक वर्ग सातत्याने देत हाेते. यापूर्वी थेट राजराजेश्वराच्या पिंडीला स्पर्श करून दर्शन करता येत हाेते; मात्र सध्या नियमांचे बंधन असल्याने भक्तांना दुरूनच दर्शन घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
महापाैरांनी केली आरती
अकाेल्याच्या महापाैर अर्चना मसने यांंच्यासह भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी श्री राजराजेश्वराची आरती केली. मंदिरे उघडावेत यासाठी भाजपानेही आंदाेलन केले हाेते. त्यामुळे साेमवारी आरती करून राजेश्वर भक्तांनी आनंद व्यक्त केला.