बार्शीटाकळी : वाढत्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामीण भागातील महत्त्वाचे ठिकाणी असलेल्या वर्दळीच्या गावात कोरोना संक्रमणाची भीती वाढत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १८ मे रोजी प्रकाशित करताच धाबा ग्रामपंचायतने मुख्य चौकात विविध व्यवसायाची दुकाने असलेल्या दुकानदारांना कारवाईचा इशारा दिला आहे.
१९ मे रोजी ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी ध्वनिक्षेपक यंत्राद्वारे दवंडी देऊन सर्व दुकानदारांना सूचना दिल्या आहेत. तसेच तहसीलदार गजानन हामंद यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची त्वरित दखल घेऊन गर्दी होत असलेल्या बँकेच्या ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांची रॅपिड टेस्ट करण्याच्या सूचना बैठकीद्वारे आरोग्य यंत्रणेला दिल्या. त्यानुसार आता तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा बँक या ठिकाणी ग्राहकांची रॅपिड टेस्टद्वारे कोरोना तपासणी होणार आहे.