संतोष येलकर, अकोला: धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी बुधवार, २५ ऑक्टोबर रोजी भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्ह्याच्या वतीने अकोला क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित करण्यात आलेला धम्म मेळावा आणि मिरवणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून, धम्म मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत.
या पार्श्वभूमीवर अकोल्यात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून आंबेडकरी अनुयायांची गर्दी उसळणार आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन वर्धापन दिनानिमित्त २५ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता रेल्वे स्टेशन येथून मिरवणुकीला प्रारंभ होणार शहरातील विविध प्रमुख मार्गांने मार्गक्रमण करीत सायंकाळी ६ वाजता अकोला शहरातील क्रिकेट क्लब मैदान येथे आयोजित धम्म मेळाव्यात मिरवणुकीचा समारोप होणार आहे. भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पी. जे. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या धम्म मेळाव्यात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे. भन्ते बी. संघपाल महाथेरो, प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा आणि संलग्नित विविध संस्थांचे पदाधिकारीही मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत.
बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी अकोला जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने धम्म मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
बाळासाहेब आंबेडकर यांच्या संदेशाकडे लागले लक्ष!
विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी दरवर्षी अकोल्यात आयोजित धम्म मेळाव्यात ॲड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी बौद्ध धम्म उपासकांसह आंबेडकरी अनुयायी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यानुसार यंदाच्या धम्म मेळाव्यालाही अनुयायांची गर्दी उसळणार आहे. त्यानुषंगाने धम्म मेळाव्यात बाळासाहेब आंबेडकर कोणता संदेश देतात आणि कोणती घोषणा करतात, याकडे अनुयायांसह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.