तेल्हारा : गत १० जानेवारी रोजी एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्कार, लैंगिक छळप्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी नोंदविण्यास टाळाटाळ केल्यामुुळे महिलेने मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन दिले; मात्र अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपातर्फे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना १८ जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात नमूद आहे की, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात ३ अपत्ये असल्याबाबत खोटी माहिती दिल्याने त्यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याचा आरोपही भाजपाने निवेदनातून केला आहे. त्यामुळे ना. धनंजय मुंडे यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवेदनातून केली आहे. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नयना मनतकार, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मोनिका वाघ, तालुका सरचिटणीस वनश्री मारोडे, सुषमा शेगोकार, जयश्री झाडोकार, आशा वानखडे यांच्यासह महिला आघाडी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.