अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांमध्ये धोका वाढल्याचे दिसून येत असले, तरी मृतांमध्ये सर्वाधिक आकडा ५५ वर्षावरील रुग्णांचा आहे. यातील ६५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त मधुमेह, उच्चदाब, कर्करोग यासारखे आजार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ५५ वर्षावरील व्यक्तींना कोरोनाचा सर्वाधिक धोका होता. याच वयोगटातील बहुतांश व्यक्तींमध्ये कोरोनाचे गंभीर लक्षणे आढळून येत होती, शिवाय मृत्यूचे प्रमाणही याच वयोगटातील व्यक्तींमध्ये जास्त होते, मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुणांमध्येही धोका वाढला आहे. गंभीर रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. असे असले, तरी मृत्यूचे प्रमाण अजूनही ५५ वर्षावरील रुग्णांचे जास्त आहे. मृतांमध्ये बहुतांश रुग्णांना मधुमेह, उच्चदाब, कर्करोग यासह इतर गंभीर आजार असलेल्या सुमारे ६५ टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांचा समावेश आहे. कोरोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलांमुळे तो आणखी घातक ठरत आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंत २०२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी सुमारे १३० पेक्षा जास्त रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतर गंभीर आजार होते. इतर आजारांमुळे या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती आधिच कमकुवत होती. कोरोनामुळे ती आणखी कमकुवत झाल्याने अशा रुग्णांचे शरीर उपचारास प्रतिसाद देत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
एप्रिल महिन्यात झालेले मृत्यू
२०२
इतर आजारामुळे मृत्यू - १३०
कोरोनामुळे मृत्यू - ७२
अतिजोखमीच्या व्यक्तींनी काय करावे?
५० वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील विशेषत: ज्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवात, कर्करोग यासह इतर गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, अशा व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका असतो. अशा अतिजोखमीच्या व्यक्तींनी इतरांच्या संपर्कात येणे टाळावे, मास्कचा वापर करावा, हात नियमित स्वच्छ धुवावेत, पौष्टिक आहार घ्यावा, प्राणायाम करावा, डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक औषधोपचार घ्यावा. तसेच कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ उपचारास सुरुवात करावी.