- अतुल जयस्वाल
अकोला: क्षयरोगाचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने टीबी मुक्त अकोला २०२० ही मोहीम राबविण्यात येत असून, या मोहिमेचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या अंगणवाडीतील बालकांच्या आरोग्य तपासणी मोहिमेत १३ एप्रिलपर्यंत तपासणी झालेल्या ३३,९६३ बालकांपैकी १३७ बालकांमध्ये क्षयरोगाची लक्षणे आढळून आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०२५ पर्यंत संपूर्ण भारत देश क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केल्याच्या पृष्ठभूमीवर अकोला जिल्हा २०२० पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या आदेशानुसार आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांच्या मार्गदर्शनात क्षयरोग तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गतच राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत २ ते ३० एप्रिलदरम्यान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमधील बालकांची आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. सोमवार, २ एप्रिलपासून ही मोहीम सुरू झाली असून, जिल्हाभरातील शहर व ग्रामीण भागात १९ पथके या मोहिमेसाठी कार्यरत आहेत. या पथकांमध्ये प्रत्येकी एक महिला वैद्यकीय अधिकारी, पुरुष वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट व एएनएम अशा चार सदस्यांचा समावेश आहे. ही पथके जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांमध्ये जाऊन बालकांची आरोग्य तपासणी करीत आहेत. जिल्ह्यात एकून १,६१३ अंगणवाडी केंद्रे असून, त्यामध्ये १ लाख १९ हजार ८४२ बालकांची नोंदणी आहे. २ एप्रिलपासून सुरू झालेल्या आरोग्य तपासणी मोहिमेत आतापर्यंत ४५४ अंगणवाडी केंद्रांमधील एकूण ३३ हजार ९६३ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी १३७ बालकांमध्ये क्षयरोगसदृश लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये अकोला तालुक्यात ३२, अकोट तालुका ९, बार्शीटाकळी १०, बाळापूर १७, पातूर १२, तेल्हारा १९, अकोला शहर ३४, तालुक्याच्या शहरांमध्ये ४ बालके संशयित टीबी रुग्ण आढळून आली.रविवारी सर्वोपचारमध्ये विशेष तपासणी शिबिरया मोहिमेदरम्यान क्षयरोगाची लक्षणे आढळून आलेल्या बालकांची तपासणी करण्यासाठी सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील कक्ष क्र. २० मध्ये रविवार, १५ एप्रिल रोजी विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर सीबी नेट मशीनद्वारे बालकांची तपासणी करणार आहेत. यापुढे प्रत्येक रविवारी हे विशेष शिबिर राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकिशोर कांबळे यांनी सांगितले.सन २०२० पर्यंत जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार जिल्हा प्रशासनाने केला आहे. त्या अनुषंगाने बालकांची आरोग्य तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून, क्षयरोगाची लक्षणे आढळून आलेल्या बालकांसाठी विशेष तपासणी शिबिर ठेवण्यात आले आहे.
- डॉ. राजकुमार चौहान, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.