अकोला : पावसाळ््यात दूषित पाणी, अस्वच्छतेमुळे अतिसाराच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग पावसाळ्यापूर्वी जनजागृती करणार आहे. त्यासाठी उद्या, २८ मेपासून जिल्ह्यात अतिसार पंधरवडा राबविण्यात येत आहे. जनजागृतीसाठी आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होतात. सर्वत्र अस्वच्छता, माशांच्या प्रादुर्भावामुळे अतिसाराची लागण होते. रुग्णांच्या समस्या झपाट्याने वाढू लागतात. यातच डायरिया, मलेरियासारखे आजारही डोके वर काढतात. थकवा, जेवण न जाणे, वजन कमी होणे अशा समस्याही उद््भवू लागतात. या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभाग पावसाळ्यापूर्वीच सतर्क झाला आहे. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेंतर्गत २८ मेपासून अतिसार पंधरवडा राबविण्यात येत आहे. ९ जूनपर्यंत चालणाऱ्या पंधरवड्यात आरोग्य विभागातर्फे प्रत्येक गावात घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक घरात ‘ओआरएस’ पावडर आणि झिंकच्या गोळ्यांचे वाटप केले जाईल.