जिल्ह्यात कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे नो मास्क नो एन्ट्री, गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई या प्रकारचे उपक्रम राबविले. तसेच गर्दी टाळण्यासाठी लग्नसमारंभासह इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर मर्यादा आणली. अनेक कार्यक्रम रद्द करत कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. अशातच कोरोनाचे सर्व नियमांना केराची टोपली दाखवत जठारपेठ परिसरातील शगुन सभागृहात व्यावसायिक प्रदर्शन भरविण्यात आले. कमी जागेत क्षमतेपेक्षा जास्त व्यावसायिक दालने थाटण्यात आली. प्रदर्शनाच्या आयोजकांनी येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा विचारच केला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे व्यावसायिक प्रदर्शन पाहण्यासाठी येथे आलेल्या महिलांची प्रचंड गर्दी झाली. विशेष म्हणजे येथे येणाऱ्या महिलांसह लहान मुलांना विनामास्क प्रदर्शनात प्रवेश देण्यात आला. प्रदर्शन आयोजकाची ही बेफिकिरी कोरोनाला निमंत्रण देणारी ठरत आहे. प्रदर्शनस्थळी आयोजकांशी संपर्क साधला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
प्रदर्शन व्यावसायिकाची बेफिकिरी उठली अनेकांच्या जिवावर
व्यावसायिक प्रदर्शनातून जास्त आर्थिक लाभ मिळावा म्हणून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक नियमांना बगल देत क्षमतेपेक्षा जास्त व्यावसायिक दालने थाटली. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या थेट संपर्कात येत आहे. त्यामुळे कोराेनाचा संसर्ग एकापासून दुसऱ्याला होण्याची भीती नाकारता येत नाही. प्रदर्शन व्यावसायिकांची ही बेफिकिरी अकोलेकरांच्या जिवावर बेतणारी ठरू शकते.
प्रशासन काेणासाठी मेहरबान
लग्नसमारंभासह इतर सामाजिक कार्यक्रमांवर प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात आले असताना व्यावसायिक प्रदर्शनात होत असलेली गर्दी आणि त्यातून उद्भवणारा संभाव्य धाेका याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे. प्रदर्शन आयोजकांच्या बेफिकिरीवर प्रशासन मेहरबान आहे, की संबंधितांवर कारवाई होणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.