अकोला : कोरोनामुळे आर्थिक डबघाईस आलेल्या एसटी महामंडळाकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी दररोज ९-१० बस सोडण्यात येत आहेत; परंतु या फेऱ्यांमधून एसटी महामंडळाला एक रुपयाही उत्पन्न मिळत नाही. या उलट डिझेलचा खर्चही घरूनच अशी परिस्थिती झाली आहे. मागील वर्षभरापासून एसटी महामंडळाच्या प्रवासी वाहतूक सेवेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोनामुळे वारंवार होणारे लॉकडाऊन व कडक निर्बंध यासाठी कारणीभूत ठरत आहे. एसटीची चाके थांबल्याने महामंडळाला मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कडक निर्बंधांमध्ये १३ दिवस एसटी बसच्या वाहतुकीला ब्रेक लागला होता. रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले. यामुळे पुन्हा एसटी बसची सेवा सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना प्रवास करण्यात मुभा देण्यात आली असून २२ प्रवाशांपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्यास बंदी आहे. त्यामुळे फेरीचा खर्चही निघणे अवघड झाले आहे. महामंडळाला डिझेल खर्चही स्वत:च्या पैशातून करावा लागत आहे.
एका फेरीच्या खर्चाचा ताळामेळ
खामगाव, शेगाव या ५० किमी धावणाऱ्या एसटी बसला एका फेरीसाठी २०-२२ लिटर डिझेल लागते. म्हणजेच जवळपास २ हजार रुपये डिझेल खर्च येतो. तर २२ प्रवासी तेही थेट शेगाव, खामगाव असल्यास या प्रवाशांकडून १३०० रुपयांचे उत्पन्न मिळते. प्रवासात मध्येच उतरणारे प्रवासी असल्यास ते उत्पन्नही घटते. त्यामुळे या फेऱ्यांचा डिझेल खर्चही निघत नाही.
प्रवासी संख्या वाढल्यास आर्थिक गणित बदलणार
केवळ २२ प्रवाशांमध्ये प्रवासी वाहतूक करणे एसटी महामंडळाला परवडणारे नाही. प्रवासी संख्या वाढल्यास कमीत कमी डिझेल खर्च तरी निघेल असे अपेक्षित आहे. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक गणितही बदलेल.
जिल्हा रेडझोनमध्ये मग निर्बंध हटणार का?
प्रवासी वाहतुकीसाठी जिल्ह्यामध्ये निर्बंध आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पाहता सद्य:स्थितीत जिल्हा रेडझोनमध्ये आहे. त्यामुळे १ जूनपासून निर्बंध हटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निर्बंध हटल्यास प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे.
संघटनेचे पदाधिकारी म्हणतात...
कमी प्रवाशांमुळे फेऱ्यांमधून उत्पन्न मिळणे कठीण आहे. अनावश्यक फेऱ्या न चालविता ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेथेच फेऱ्या चालवाव्या, जेणेकरून महामंडळाला आणखी आर्थिक फटका बसणार नाही.
- रूपम वाघमारे, विभागीय सचिव, एसटी संघटना
दररोज सुटणाऱ्या बस
१०
दररोज सुटणाऱ्या फेऱ्या
२०
एक लिटर डिझेलची किंमत
९० रुपये
५० किमीसाठी डिझेल खर्च (एकफेरी)
२,००० रुपये