शिरपूर जैन (जि. वाशिम) : नित्यनेमानुसार येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिरात पोलीस बंदोबस्तात दिगंबरी आणि श्वेतांबरी पुजारीं पूजेकरिता गेले असता, प्राचीन दिगंबरी खड्गासनस्थ उभ्या आसनातल्या काळ्या पाषाणाच्या सात मूर्ती आढळल्या, अशी माहिती अँड. वैशाली वालचाळे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याबाबत अधिक माहिती देताना अँड. वालचाळे यांनी सांगितले की, १२ जुलै रोजी शिरपूर येथील जैन मंदिरात पोलिस बंदोबस्तात दिगंबरी पंडित अजय व श्वेतांबरी पुजारी पूजेसाठी आत गेले असता, अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवतांच्या मूर्तीजवळ त्यांना काळा नाग दिसला. मूर्तीजवळून पुढे हा नाग कोठे जातो, हे पाहण्यासाठी पुजारी अजय दिवा घेऊन त्याच्या मागे गेले असता, तो ज्या कोपर्यात गेला, तेथे एक छोटी कपार आढळली. त्या कपारीत अजय गेले असता, तिथे दिव्याच्या उजेडात अडीच ते तीन फूट उंचीच्या चार मूर्ती आढळल्या. यांसह पंचमेरूच्या तीन धातूच्या मूर्ती सापडल्या. यामध्ये पंचबालयती वासुपूज्य, पार्श्वनाथ, नेमिनाथ, मल्लीनाथ, महावीर व पदमावती देवी या मूर्त्यांचा सामावेश असल्याचे अँड. वालचाळे यांनी सांगितले. सदर मूर्ती सापडल्यानंतर परिसरातील जैन व इतर बांधव दर्शन घेण्यासाठी शिरपूर येथे आले; मात्र मूर्ती तळघरातील गाभार्यामध्ये असल्यामुळे आणि दिगंबरी व श्वेतांबरीच्या वादामुळे परिस्थिती ह्यजैसे थेह्ण ठेवण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे कोणालाही मूर्तींचे दर्शन घेता आले नाही. मंदिराचा वाद लवकर सुटावा, याकरिता समाजातील सर्व मुनी महाराज, माताजी, ङ्म्रावक अनुष्ठान विधान नियमितपणे करीत आहेत, त्याचाच प्रत्यय रविवारी आल्याचे अँड. वालचाळे म्हणाल्या. यावेळी योगेश मनाटकर, संजय कान्हेड, रमेश काळे, दिगंबरी पंडित अजय आदी उपस्थित होते. यासंदर्भात येथील पोलीस निरीक्षक रमेश जायभाये यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ठरल्याप्रमाणे सकाळी अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिरात दिगंबर व श्वेतांबर पुजार्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत पार्श्वनाथाची पूजा केली असल्याचे स्पष्ट केले. यावेळी दिगंबरी पुजारी पंडित अजय यांनी साप-साप म्हटल्याने ते वगळता इतर जण भीतीपोटी बाजूला सरकले. यावेळी पंडित अजय यांनी मंदिरात अडगळीत पडलेली मुर्ती उचलून बाहेर आणली व पेढीवर ठेवली. त्यावर आतील मूर्ती बाहेर का आणली, असा आक्षेप श्वेतांबरी गटाने घेतला. यानंतर दोन्ही गटांमधील सामंजस्याने मूर्ती गाभार्यात पूर्वीच्या ठिकाणी नेऊन ठेवण्यात आली. दिगंबर पंडित अजय यांना असे कृत्य पुन्हा घडणार नाही, अशी समज त्यांना आपण दिली आहे. विज्ञान युगात चमत्काराला थारा नाही. असा कुठलाच चमत्कार याबाबत घडलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
जैन मंदिराच्या तळघरात आढळल्या दिगंबरी मूर्ती !
By admin | Published: July 13, 2015 1:44 AM