लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: स्मार्ट ग्राम योजनेतील तालुका आणि जिल्हा स्तरावर बक्षीस वितरणासाठी शासनाकडून सात महिन्यानंतरही निधी न मिळाल्याने जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने शासनाला स्मरणपत्र देत निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. जिल्हा परिषदेकडे प्राप्त ३४ लाख रुपये वाटपासाठी ठाणे जिल्हा परिषदेकडे वर्ग केलेला निधी मिळाल्याशिवाय हा निधी मुक्त होत नसल्याचीही अडचण आहे. केंद्र शासनाकडून ‘डिजिटल इंडिया’चे ढोल बडवले जात असताना त्यासाठी तयार असलेल्या ग्रामपंचायतींना बक्षिसांची रक्कम न देण्याचा करंटेपणाही केला जात असल्याचे चित्र आहे.स्मार्ट ग्राम योजनेची सुरुवात डिसेंबर २०१६ पासून झाली. त्यामध्ये सहभागी गावांची तालुका स्तरावर निवड करण्यात आली. त्या गावांना २६ जानेवारी रोजीच बक्षीस वितरण करण्याचे ठरले होते; मात्र निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे बक्षीस वितरण पुढे ढकलले. त्यानंतर जिल्हास्तरीय गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच १ मे महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम बक्षीस वितरणासाठी निश्चित झाला. या कार्यक्रमात संंबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते ग्रामपंचायतींना रोख बक्षिसांसह प्रमाणपत्र वितरण करण्याचे शासनाने आधीच बजावले होते. त्याचवेळी राज्यात १०४ कोटींची गरज असताना त्यातील केवळ दहा कोटी ५६ लाख रुपयेच शासनाने दिले. त्यामुळे महाराष्ट्र दिनी ग्रामपंचायतींना प्रमाणपत्रावर समाधान मानावे लागले. आधीचे पाच आणि त्यानंतर तीन महिने उलटले तरीही बक्षिसांची रक्कम जिल्हा परिषदांना मिळालेली नाही. प्रथम गावाला १० ते ४० लाखांचे रोख बक्षीस शासनाने स्मार्ट ग्राम योजनेत ग्रामपंचायतींना बक्षिसांची रक्कमही ठरवून दिली. त्यामध्ये तालुक्यातून प्रथम ग्रामपंचायतींना १० लाख रुपये, तर जिल्हा स्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतीला ४० लाख रुपये रोख बक्षीस दिले जाते. निधीसाठी सातत्याने मागणीग्रामपंचायतींची निवड करून त्यांना २६ जानेवारी रोजी बक्षीस वितरणाचेही ठरले आहे; मात्र आचारसंहितेमुळे बक्षीस वितरण लांबले. त्यानंतर १ मे महाराष्ट्र दिनी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते बक्षीस देण्याचे ठरले असतानाही त्यासाठी निधी देण्यात शासनानेच हात आखडता घेतला. बक्षिसांसाठी ७० लाख रुपये निधीच मिळत नसल्याने जिल्हा परिषदांना त्याबाबत सातत्याने शासनाला स्मरणपत्र देत मागणी करावी लागत आहे.स्मार्ट गावे तालुका स्मार्ट ग्राममध्ये अकोला तालुक्यातील म्हातोडी, बाळापूर- खिरपुरी बुद्रूक, पातूर- बेलुरा बुद्रूक, बार्शीटाकळी-धाबा, मूर्तिजापूर-जितापूर खेडकर, अकोट-धारेल, तेल्हारा- खापरखेड ही गावे १० लाखांच्या बक्षिसासाठी पात्र आहेत. निधीच नसल्याने जिल्हा स्तरावर निवड प्रक्रियेबाबतही माहिती उपलब्ध नाही.
स्मार्ट ग्रामच्या बक्षिसांनी रोखला डिजिटल इंडियाचा मार्ग
By admin | Published: July 17, 2017 3:20 AM