दिग्रस बु. : चान्नी पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या दिग्रस बु. येथे गत आठवडाभरात चार ते पाच चोरीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, सोमवारी पुन्हा चोरीचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिग्रस बु. येथे दि. ७ जूनच्या मध्यरात्री धाडसी चोरी झाली होती. गावातील उत्तम गावंडे यांच्या घरात चोरी करीत दागिन्यासह रोख लंपास केली. सुभाष बराटे यांच्या घरातील रोख लंपास केली होती. बसस्थानक परिसरात असलेल्या अजित ताले यांची दुचाकी लंपास केली. चार दिवसापूर्वी गाय चारचाकी वाहनात कोंबून नेल्याची घटना घडली होती. दरम्यान, सोमवारी पुन्हा रात्रीच्या बकऱ्या चोरीचा प्रयत्न करीत असताना घरातील व्यक्तीला जाग आल्याने प्रयत्न फसला. या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रा.डॉ. धनराज धोत्रे यांनी ठाणेदारांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पाहणी केली आहे.
पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
परिसरात महिन्यातील चोरीची पाचवी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन गावात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.