निर्गुणा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा जोरात!
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील अंधारसागवी परिसरात निर्गुणा नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा जोरात सुरू असून, दिवसाढवळ्या या रेतीची अवैध वाहतूकही होत आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. त्यामुळे या अवैध वाळू वाहतुकीकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात बसफेऱ्याची प्रतीक्षा कायम
बाळापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात बसफेऱ्या अद्यापही पूर्ववत सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी होत आहे.
दिग्रस बु -दिग्रस खु. निर्माणाधीन रस्त्याचे निकृष्ट काम
दिग्रस बु: पातूर तालुक्यातील दिग्रस बु-दिग्रस खुर्द या निर्माणाधीन मुख्य रस्त्याचे निकृष्ट काम होत असल्याचा आरोप वाहनचालकांकडून होत आहे. रस्त्यावरील टाकलेली मोठी खडी उखडून निघत आहे. त्यामुळे पादचारी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पणज परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस
पणज : आकोट तालुक्यातील ग्राम पणज परिसरात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी त्रस्त झाले आहेत तसेच वन्यप्राणी हल्ला करत असल्याने शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी शेतकरी संजय आवंडकार, शेतमजूर अशोक काळबाग शेतात गेले असता रानडुकरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला होता.
मन नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक
लोहारा : बाळापूर तालुक्यातील लोहारा परिसरातील मन नदीपात्रातून रेतीची अवैध वाहतूक सर्रास सुरू आहे. जड वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
शेततळ्यामुळे वाढली विहिरीची पातळी
तेल्हारा: तालुक्यातील भूजल पातळी खोल गेल्याने चिंता वाढली आहे, तसेच सिंचनामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. दुसरीकडे, कृषी विभागाकडून जलसंधारणाच्या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. तालुक्यातील भांबेरी येथे एका शेतकऱ्याने शेततळ्याचा लाभ घेतला. यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे शेततळ्यामध्ये मुबलक पाणी असून, विहिरीच्या पातळीतही वाढ झाली आहे.
पीकविमा मंजूर करण्याची मागणी
पातूर : यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने लक्ष देऊन पीकविमा मंजूर करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
वनप्राण्यांचा हैदोस; शेतकरी चिंतित
पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा परिसरात वन्यप्राण्यांचा हैदाेस वाढला असून, पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. हरभऱ्यासह रब्बी पिकांची वन्यप्राण्यांकडून नासाडी हाेत आहे. शेतकऱ्यांना शेतात जागरण करून पिकांचे संरक्षण करण्याची वेळ आली आहे. तरी वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदाेबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे.
पिंजर परिसरात व्हायरल फिव्हरची साथ
निहिदा: पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६४ खेडेगाव असून बहुतांश गावातील लोकांना साथ रोगाची लागण झाली आहे, लोकांना थंडी वाजून ताप येणे, हात पाय दुखणे, मळमळ होणे, डोके दुखणे आदी आजाराने पिंजर व परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सोनाळा येथे दारुची अवैधविक्री
बोरगाव मंजू: बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळा येथे अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या बाबीकडे पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.