अकोला: ताजनापेठ पोलिस चौकीजवळ एका रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास जेवण करणे चार युवकांना चांगलेच महागात पडले. कोतवाली पोलिसांनी हॉटेलमालक, मॅनेजरसह चार ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. कोतवाली पोलिस २७ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना, ताजनापेठ पोलिस चौकीजवळ एक रेस्टॉरंट बाहेर बंद होते. परंतु आतमध्ये ग्राहकांची रेलचेल दिसून आली. त्यामुळे कोतवाली पोलिसांनी आत जाऊन पाहिले असता, हॉटेलमालक अब्बास खान अहमद(७५), मॅनेजर फिदा हुसेन (२४) हे दोघे रात्री उशिरापर्यंत रेस्टॉरंट चालवीत असल्याचे आढळून आले.
यावेळी रेस्टॉरंटमध्ये चार युवक जेवण करीत असल्याचे आढळून आले. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व आस्थापना या रात्री ११ पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतरही हॉटेलमालक व मॅनेजर हे रात्री उशिरापर्यंत रेस्टॉरंट सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आल्याने, त्यांसह चार युवकांविरुद्ध भादंवि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कोणताही हॉटेल, रेस्टॉरंटचालक रात्री ११ नंतर हॉटेल, रेस्टॉरंट किंवा कोणतेही दुकान सुरू ठेवत असेल तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कोतवाली पोलिसांनी दिला आहे.