दिनोडा-रोहणखेड शेतरस्ता अद्यापही दुरुस्त करण्यात आला नाही. रस्त्यावर तात्पुरती गिट्टी किंवा मुरुम टाकण्यात आला नाही. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे, तर संपूर्ण रस्ता हा चिखलमय झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात दरवर्षी शेतकऱ्याला चिखल तुडवित शेतात जावे लागते.
रोहनखेड परिसरात ९५ टक्के शेतकरी, मजूर शेती व्यवसाय करतात. शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. सध्याच्या स्थितीत खरीप हंगामातील कामांना वेग आला आहे. त्यामुळे शेतात ये-जा वाढली आहे. शेतकऱ्यांना रस्त्याने जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दिनोडा-रोहनखेड शेत रस्त्याला निधी मंजूर झाल्याची माहिती आहे; मात्र अद्याप कामाला सुरुवात झाली नसल्याने शेतकऱ्यांना नाहक अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
---------------
सध्या पावसामुळे रोहनखेड ते दिनोडा शेतरस्त्याची फारच बिकट स्थिती झाली आहे. या रस्त्याने शेतात बैलबंडी नेता येत नाही. रस्त्यावर चिखल साचला असून, पायी चालतानाही कसरत करावी लागते. शेतकऱ्यांना पावसाळ्यात खूप त्रास होते. प्रशासनाने शेतरस्त्याची दुरुस्ती करावी.
-अनिता चव्हाण सरपंच रोहन खेड
--------------------------
माझे शेत रोहनखेड ते दिडोना शेतरस्त्यावर असल्याने सध्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले असून, संपूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे.
- भुजंगराव झामरे, शेतकरी. रोहनखेड.