- लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: होय, सर्वसामान्य अकोलेकरांना ६५० चौरस फूटपर्यंत बांधकाम करायचे असेल, तर परवानगीसाठी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही. परवानगीचे अधिकार वास्तुविशारद, अभियंते व शाखा अभियंता यांना देण्यात आले असले तरी याविषयी अकोलेकरांमध्ये जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र आहे. अर्थात, नागरिकांचे हेलपाटे वाचविण्यासाठी नगररचना विभागाने यासंदर्भात जनजागृतीसाठी पुढाकार घेण्याची गरज असून, प्रत्यक्षात तसे होत नसल्याने गोरगरीब नागरिक ांची फसवणूक होत असल्याची माहिती आहे.घर बांधकामासाठी मनपाच्या नगररचना विभागाची परवानगी आवश्यक ठरते. शासनाने वास्तुविशारद यांच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीद्वारे नकाशा मंजुरीसाठी फाइल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने तशी यंत्रणा कार्यान्वित झाली असली तरी अनेकदा ही यंत्रणा कोलमडून पडत राहत असल्याने नकाशा मंजुरीला विलंब होत असल्याचे दिसून येते. निवासी इमारती, कमर्शियल कॉम्प्लेक्स, डुप्लेक्स आदी बांधकामासाठी विविध परवानगीची आवश्यकता क्रमप्राप्त असली तरी ६५० चौरस फूटपर्यंत बांधकाम करायचे असल्यास संबंधित मालमत्ताधारकाला नगररचना विभागाकडून थेट परवानगी देण्याची तरतूद शासनाने अडीच वर्षांपूर्वीच करून ठेवली आहे. अर्थात, या नियमावलीचा आधार घेऊन सर्वसामान्य नागरिकांची असंख्य प्रकरणे सहज निकाली काढल्या जाऊ शकतात.त्यामुळेच नगररचना विभागाने यासंदर्भात जनजागृती न करण्याचे धोरण अवलंबिल्याचे दिसून येत आहे.
६५० चौरस फूट बांधकामाला थेट परवानगी; नागरिकांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 2:43 PM