अकोला: जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पाठपुराव्याने आणि पालकमंत्री रणजित पाटील यांच्या पुढाकाराने यांच्या मार्गदर्शनात विषय शिक्षक नियुक्तीबाबत नुकतेच शासनाचे पत्र प्राप्त झाले. रँडम राउंडमधील जास्तीत जास्त शिक्षकांना पदनिश्चिती करून पदस्थापना देण्याचे आणि अतिरिक्त सहायक शिक्षकांचे समायोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.रँडम राउंडमधील दर्जोन्नत होणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या विषयाची जागा त्याच शाळेत रिक्त असल्यास त्याच शाळेवर ठेवणे या मुद्यावर अनेक शिक्षकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे; परंतु जिल्ह्यातील रँडमायझेशन राउंडमध्ये जवळपास पाचशे शिक्षकांचा समावेश झाला होता. यातील सर्व शिक्षक हे गैरसोयीने पदस्थापित झाले असे नाही. यामधील ५0 टक्के शिक्षक हे रँडमायझेशन राउंडमध्येही सोयीने पदस्थापित झाले. त्यांना विस्थापित करून पुढे जाणे हे कदापिही योग्य होणार नाही. त्यांना संधी दिली आहे. रँडमायझेशन राउंडमध्ये पदस्थापित झालेल्या दर्जोन्नती पात्रता असलेल्या शिक्षकांची त्यांच्या विषयाची जागा त्या शाळेत रिक्त आहे. असे शिक्षक आपोआपच सेवाज्येष्ठता राउंडसाठी पात्र होतील. नाइलाजाने काही शिक्षकांचा समावेश हा गैरसोयीच्या शाळेत होत असल्यास असे शिक्षक दर्जोन्नतीला नकार देऊन समायोजनमध्ये सोयीच्या ठिकाणी जाण्याची संधी घेऊ शकतात. विषय शिक्षक स्थापनेची प्रक्रिया आॅनलाइन प्रमाणे खो-खोचा खेळ न होता सर्वांना न्याय देण्याच्या उद्देशाने राबवली जावी, अशा पद्धतीने तयार करण्यात आली. यामध्ये अगदी सोयीची किंवा इच्छित शाळा मिळणे अपेक्षित नसून तालुका बदलून ८0 ते ९0 किलोमीटरवर गेलेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ तालुक्यात जाता यावे, याच उद्देशाने विषय शिक्षक स्थापनेची प्रक्रिया तयार करण्यात आली आहे. अशा पदस्थापनेमुळे रँडमायझेशन राउंडमुळे पदस्थापित झालेले जे शिक्षक विस्थापित होणार आहेत, अशा शिक्षकांना दर्जोन्नतीप्राप्त शिक्षकांच्या प्राथमिक शिक्षक पदाच्या मूळ रिक्त जागेवर दाखवून त्या पदावर त्यांना समुपदेशनाने पदस्थापना द्यावी, असे निर्देश ग्राम विकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले आहेत. (प्रतिनिधी)