अकाेला: शहरातील तणावपूर्ण वातावरणा दरम्यान रविवारी सकाळी ११ वाजता जुने शहर पोलिस ठाण्यात सर्वपक्षीय शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांसह पोलिस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्यातर्फे अकोलेकरांना शांतता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच या प्रकरणातील दोषिंवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन नागपूर पोलिस क्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. छेरींग दोरजे यांनी केले.
संवेदनशील शहर म्हणून ओळख असलेल्या अकोल्यात गत अनेक वर्षांपासून सामाजिक सलोखा कायम आहे. अशातच शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. हे पोलिसांचे अपयश असल्याचा रोष यावेळी लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला. दरम्यान घटनेचा सर्वांगीण तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली. यावर उत्तर देत, कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.
सीसीटीव्ही आणि सामाजिक माध्यमावरील व्हिडिओच्या माध्यमातून गुन्हेगारांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन यावेळी नागपूर पोलिस क्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक डॉ. छेरींग दोरजे यांनी दिले. तसेच नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगावी, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकारी निमा अरोरा, नागपूर पोलिस उपायुक्त राकेश कलासागर, भाजपा आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोर मिटकरी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, नगरसेवक राजेश मिश्रा, काँग्रेस नगरसेवक साजिदखान पठाण यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.