लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोर्णेच्या नदीपात्रातील घाण सांडपाणी पाहता गणेश विसर्जनावर प्रश्नचिन्हं निर्माण झाले आहे. त्यामुळे अकोलेकरांनो, आपल्या लाडक्या गणेशाचे मोर्णेच्या पात्रात विसर्जन न करता महापालिकेने तयार केलेल्या गणेश घाटांचाच वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. गणेश विसर्जनासाठी अकोलेकर मोर्णा नदीला प्राधान्य देतात; परंतु मागील काही वर्षांत शहरातील घाण सांडपाणी मोर्णा नदीच्या पात्रात सोडल्या जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी घाण, कचरा, प्लास्टिक पिशव्या तुंबल्या आहेत. नदी काठावर दुर्गंधीमुळे थांबणे अशक्य होते. अशास्थितीत नदीपात्रातील घाण पाण्यात सर्वांचे लाडके दैवत असणार्या गणेशाचे विसर्जन कसे करणार, असा सवाल गणेश भक्तांमध्ये उपस्थित झाला आहे.
याठिकाणी विसर्जन नकोच!संपूर्ण मोर्णा नदी प्रदूषित झाली आहे. यात प्रामुख्याने निमवाडी परिसरात नदी पात्रात घाण पाणी, प्लास्टिक पिशव्यांचा कचरा साचला असून, प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तरी सुद्धा याठिकाणी गणेश विसर्जनासाठी अकोलेकर गर्दी करतात, ही दुर्दैवाची बाब आहे. काही गणेश भक्त पुलावरून गणेश विसर्जन करतात. घाण पाण्यात गणेश विसर्जन करणे कितपत योग्य, याचा गणेशभक्तांनी विचार करण्याची गरज आहे.
सिटी कोतवाली, हरिहरपेठमध्ये गणेश घाटमनपा प्रशासनाने सिटी कोतवाली चौकात मोर्णा नदीच्या काठावर प्रशस्त गणेश घाटाची निर्मिती केली आहे. तसेच हरिहरपेठमध्येही गणेश घाट तयार क रण्यात आला असून, अकोलेकरांनी मनपाच्या घाटांवर गणेश विसर्जनाला प्राधान्य देण्याची गरज आहे.
मोर्णा नदीच्या प्रदूषणाला आपण सर्वच जबाबदार आहोत. नदी पात्रातील घाण व दुर्गंधीयुक्त पाण्यात गणेश विसर्जन न करता गणेश भक्तांनी मनपाने तयार केलेल्या घाटांचा वापर करावा. याठिकाणी स्वच्छ पाणी उपलब्ध आहे. नागरिकांनी स्वत:च्या भागात छोटेखानी कुंड तयार करून त्यामध्ये गणेश विसर्जन करावे.-विजय अग्रवाल, महापौर-