दिव्यांगांना मिळणाऱ्या विविध शासकीय याेजनांमधील काळ्या बाजाराला आळा बसावा, तसेच दिव्यांगांना कमी वेळेत दिव्यांग प्रमाणपत्र मिळावे, या अनुषंगाने सर्वोपचार रुग्णालयात स्वतंत्र दिव्यांग कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नव्याने प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सात दिवसांत दिव्यांगांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्याची व्यवस्था या अंतर्गत करण्यात आली आहे; मात्र जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने मागील आठ महिन्यांपासून कक्ष बंद आहे. त्यामुळे जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त दिव्यांगांना ऑनलाइन अर्ज करूनही दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले नाही. यातील अनेकांच्या वैद्यकीय चाचण्याही झालेल्या नाहीत. परिणामी, या दिव्यांगांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
वैद्यकीय चाचण्याही रखडल्या
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून दिव्यांग कक्ष बंद आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज करूनही या दिव्यांगांचे वैद्यकीय चाचण्या होऊ शकल्या नाहीत. वैद्यकीय चाचण्या रखडल्याने दिव्यांगांना प्रमाणपत्रापासून वंचित राहावे लागत आहे.
या याेजनांपासून दिव्यांग वंचित
एसटी बसेसचा फायदा, राशन कार्ड, घरकुल योजना, समाज कल्याण लाभाच्या योजना, चक्की, शिलाई मशीन योजना, मनपा मार्फत एक हजार रुपये प्रति महा मदतीपासून दिव्यांगांना वंचित राहावे लागत आहे.
मार्च महिन्यांपासून दिव्यांग कक्ष बंद आहे. त्यामुळे दिव्यांगांना विविध शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. दिव्यांग कक्ष सुरू करण्यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना निवेदन दिले असून, डिसेंबर महिन्याच्या शेवटी कक्ष सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. - संजय बर्डे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, अकोला.